महिलेच्या मृत्यूप्रकरणी आरोपीला बीड शहरातून केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 22:56 IST2019-07-20T22:56:23+5:302019-07-20T22:56:35+5:30
तरुणाने घरात घुसून चाकूने भोसकल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. करमाड पोलिसांनी आरोपीला बीड शहरातून अटक केली आहे.

महिलेच्या मृत्यूप्रकरणी आरोपीला बीड शहरातून केली अटक
करमाड : औरंगाबाद तालुक्यातील पिंपळगाव (पांढरी) येथे तरुणाने घरात घुसून चाकूने भोसकल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. मंदाबाई सुनील भुकेले (३६) असे मृत महिलेचे नाव आहे. करमाड पोलिसांनी यातील आरोपीला बीड शहरातून अटक केली आहे.
गावातील विलास दामोदर ठोंबरे (३३) हा १५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घरी आला. मंदाबाईने मुले पाठवून मारहाण केल्याचा आरोप करीत शिवीगाळ केली. यावेळी त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने चाकूने मंदाबाईच्या डोक्यावर वार केले.
यावेळी ती गंभीर जखमी झाली. याचवेळी रोहनने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्यासह आपल्याला मारहाण केल्याचे मंदाबाईची आई पार्वताबाई यांनी फिर्यादीत म्हटले आहे. गावातील अजिनाथ ठोंबरे व दिलीप ठोंबरे यांनी मंदाबाईला घाटी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला. उपचार सुरु असताना मंदाबाईचा शनिवारी सकाळी ९.४५ वाजता मृत्यू झाला.
पोलिसांनी आरोपी विलास ठोंबरे याला बीड शहरातील शिवाजीनगर येथून शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता अटक केली. त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक अजिनाथ रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जागडे, जमादार रमेश धस, शंकर चव्हाण सुशीलकुमार बागुल, सचिन राठोड करीत आहे.