सुपर पॉवर कंपनीचे व्यवहार सांभाळणाऱ्या लेखापालास अटक
By Admin | Updated: August 17, 2014 01:44 IST2014-08-17T01:28:18+5:302014-08-17T01:44:13+5:30
औरंगाबाद : सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड कंपनीच्या लेखापालास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाशिक येथून पकडून आणले.

सुपर पॉवर कंपनीचे व्यवहार सांभाळणाऱ्या लेखापालास अटक
औरंगाबाद : अल्पावधीत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड कंपनीच्या व्यवहाराचा लेखाजोखा ठेवणाऱ्या लेखापालास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाशिक येथून पकडून आणले. आरोपीला न्यायालयाने २२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुपर पॉवर कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या नंदा बळीराम पाटील यांच्या तक्रारीवरून कंपनीचे संचालक दीपक कडू पारखे आणि दिव्या दीपक पारखे या दाम्पत्याविरोधात २५ जुलै रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ते सध्या अटकेत आहेत.
आरोपींनी आतापर्यंत सुमारे ८० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या व्यवहाराचा लेखाजोखा ठेवणारा आणि आरोपीचा प्रमुख साथीदार शेख मोहम्मद शाहिद हमीद हमीद इब्रे मोहम्मद ऊर्फ गुड्डू (२४, रा.कठडा, टाकळी रोड, नाशिक) हा असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. त्याआधारे भद्रकाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर कड यांनी त्याच्या घरी जाऊन त्यास ताब्यात घेतले. याबाबतची माहिती आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांना कळविली.
पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, सहायक आयुक्त अविनाश आघाव, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वास पाटील, पोहेकॉ संदेश कीर्तिकर, प्रदीप धनवे, सचिन संपाळ, दादासाहेब झारगड यांनी नाशिक येथे जाऊन त्यास अटक करून आणले. त्याच्याकडून कंपनीच्या कामकाजासाठी वापरण्यात आलेले लॅपटॉप, एक संगणक आणि पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले आहे. त्यास न्यायालयात हजर करण्यात आले असता २२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर झाली आहे.