घात, अपघात आणि आत्महत्यांनी काळवंडले गोदापात्र ...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:08 IST2021-02-05T04:08:32+5:302021-02-05T04:08:32+5:30
विस्तृत पात्र, भरपूर पाणी, परिसरात असणारे तीन पूल, आणि नदीवरुन जाणारा औरंगाबाद- अहमदनगर -पुणे हा राष्ट्रीय महामार्ग या तिन्ही ...

घात, अपघात आणि आत्महत्यांनी काळवंडले गोदापात्र ...!
विस्तृत पात्र, भरपूर पाणी, परिसरात असणारे तीन पूल, आणि नदीवरुन जाणारा औरंगाबाद- अहमदनगर -पुणे हा राष्ट्रीय महामार्ग या तिन्ही कारणांमुळे घातपात, अपघात आदी घटना नदीपात्रात सर्रास घडतात. पैकी काही घटना उघडकीस येतात तर काही कायमस्वरुपी पात्रातच दबून राहत असण्याची शक्यता आहे. गोदावरी आणि प्रवरा या दोन्ही नद्यांचा संगम येथे होतो. त्यातही प्रवरानदी पूर्णता अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीत तर गोदावरीचा काही भाग अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीत येत असल्याने अनेकदा प्रेत कोणत्या हद्दीत सापडले यावरुनही वाद होतात.
सुमारे ५ वर्षांपूर्वी एक प्रेत पाण्यात तरंगताना आढळले होते. ते प्रेत पाण्याबाहेर काढतांना पोलिसांना आणखी दोन प्रेत हाथी लागले होते. एकाच दिवशी तीन प्रेत एकाच ठिकाणाहून निघाल्याने एकच खळबळ उडाली होती.
घात
उत्तरीय तपासणी अथवा पोलीस चौकशीत अनेकदा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने प्रेत नदीपात्रात फेकून दिल्याचे समोर आलेे आहे. पाच वर्षांपूर्वी एका चालकाचा मृतदेह गोदावरी पात्रात आढळला होता. पुढे पोलीस तपासात तो खून असल्याचे निष्पन्न झाले होते. असे प्रकार यापूर्वीही अनेकदा उघडकीस आले आहेत.
अपघात
पात्रातील गाळात फसून आणि नदीकाठच्या घाटावरील दगडांवरुन घसरून पाण्यात बुडाल्याने होणाऱ्या अपघातांनी जीव गमवावा लागल्याच्या घटना येथे घडल्या आहे. धुळवड खेळण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा पाय घसरला आणि त्यातच त्याचा सिद्धेश्वर मंदिरालगत गोदावरीच्या पाण्यात बुडून जिव गेला. दुसऱ्या घटनेत प्रवरापात्रातील गाळात फसून एकाला जीव गमवावा लागला. २०१९ साली मासे पकडताना एकजण तोल जाऊन अपघाताने पाण्यात बुडाला, दोन दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला.
आत्महत्या
विविध कारणांमुळे आत्महत्या करण्याच्या हेतुने नदीच्या पात्रात उडी मारुन आपली जीवनयात्रा संपविल्याच्या घटना येथे उघडकीस आल्या आहेत. मागील आठवड्यात सुद्धा गोदापात्रात अशी एक घटना घडली आहे. पती-पत्नीने आत्महत्या करण्यासाठी पाण्यात उडी घेतली होती. मात्र सुदैवाने पत्नी वाचली, तर पती बुडाला होता.
काही महिन्यांपूर्वी एका युवकाने सेल्फी काढून येथे आत्महत्या केली होती. २०१७ साली वेगवेगळ्या घटनांत ४ ते ५ मृतदेह पोलिसांना नदीच्या पात्रात आढळून आले होते. २०१८ साली सुद्धा ४ जणांचा पाण्यात बुडून जीव गेला होता.
चौकट
आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज
गोदावरी नदीच्या पात्रावर कायगाव परिसरात ३ पूल आहेत. औरंगाबाद पुणे राष्ट्रीय मार्गावरील नवीन आणि जुना पूल, तसेच सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा प्रवरा नदीवरील पूल. हे तिन्ही ठिकाण आत्महत्या करण्यासाठी नदीच्या पात्रात उडी मारण्यासाठी वापरले जातात. या पुलांवर कंठड्याच्या वरील बाजूने लोखंडी जाळीचे आवरण बसविण्यात आल्यास पुलावरून नदीच्या पात्रात उडी मारणे शक्य होणार नाही. तसेच या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची, आणि पोलीस बंदोबस्त लावल्याचीही गरज वाढली आहे. स्थानिक बचाव पथकाच्या सदस्यांना प्रशिक्षण देऊन आवश्यक वाटेल तेव्हा त्यांची मदत घेता येऊ शकते.