अर्ध्या रात्रीच शाळेचे छत कोसळल्याने दुर्घटना टळली
By Admin | Updated: July 3, 2014 00:16 IST2014-07-02T23:19:28+5:302014-07-03T00:16:35+5:30
जातेगाव: गेवराई तालुक्यातील जातेगाव जवळील बोकूडदरा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेचे छत सोमवारी मध्यरात्री कोसळले. ही घटना रात्री घडल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

अर्ध्या रात्रीच शाळेचे छत कोसळल्याने दुर्घटना टळली
जातेगाव: गेवराई तालुक्यातील जातेगाव जवळील बोकूडदरा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेचे छत सोमवारी मध्यरात्री कोसळले. ही घटना रात्री घडल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
बोकूडदरा तांडा येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरतात. या चारही वर्गात ४१ मुले शिक्षण घेत आहेत. या चार वर्गांसाठी येथे दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चार वर्गांसाठी दोन खोल्या बांधण्यात आलेल्या आहेत.
बोकूडदरा तांडा येथील शाळेची खोलीची दुरवस्था झालेली होती. यामुळे येथे नवीन शाळाखोली बांधावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली होती. या संदर्भात त्यांनी वारंवार पंचायत समितीकडे निवेदनही दिले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
सोमवारी रात्री अचानकच दोन पैकी एका शाळाखोलीचे छत कोसळले. यावेळी रात्री अचानक कशाचा आवाज झाला हे पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ग्रामस्थांना शाळाखोलीचे छत पडल्याचे दिसून आले. सुदैवाने ही गंभीर घटना मध्यरात्री घडल्याने कोणाला काही हानी झाली नसल्याचे शालेय समितीचे अध्यक्ष बाळू राठोड यांनी सांगितले. येथे नवीन शाळाखोली बांधण्याची मागणीही त्यांनी केली. (वार्ताहर)