कागदपत्रांना मंजुरी, मगच तूर खरेदी
By Admin | Updated: May 20, 2017 23:30 IST2017-05-20T23:29:48+5:302017-05-20T23:30:53+5:30
बीड : खरेदी केंद्रावर दाखल होणारी तूर शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची यामध्ये नियमितता येण्याच्या दृष्टीने खरेदीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा, पीकपेरा आदी कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे

कागदपत्रांना मंजुरी, मगच तूर खरेदी
राजेश खराडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : खरेदी केंद्रावर दाखल होणारी तूर शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची यामध्ये नियमितता येण्याच्या दृष्टीने खरेदीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा, पीकपेरा, आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील आदी कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. त्यानुसारच तुरीची खरेदी होणार आहे.
जिल्ह्यात एक लाख क्विंटल तूर शिल्लक असल्याने नाफेडच्या वतीने खरेदी केंद्रांना वाढीव मुदत देण्यात आली होती. ३१ मे पर्यंत शिल्लक साठा खरेदी करावा लागणार आहे. गेल्या २८ दिवसात ६ ते ७ हजार क्विंटल तूर खरेदी झाली असून, अद्यापही शेतकऱ्यांकडे ६० हजार क्विंटल तूर शिल्लक आहे. जिल्ह्यातील १० खरेदी केंद्रे सध्या सुरू असून, कागदपत्रांच्या तपासणीसाठी अधिकचा वेळ खर्ची पडत आहे. यापूर्वी खरेदी संदर्भातील कागदपत्रांची तपासणी केंद्रांवरील अधिकारी आणि कर्मचारीच करीत होते. व्यापाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे सर्वसामान्य शेतकरी खरेदी केंद्रापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे तहसीलदारांकडूनच शेतकऱ्यांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तपासणीनंतर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला जाणार असून, कागदपत्रांची खातरजमा झाल्यानंतरच टोकन नंबरप्रमाणे शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाणार आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना खरेदीची माहिती भ्रमणध्वनीवरून देणे कृउबातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनिवार्य राहणार आहे.
मात्र, अद्यापपर्यंत जिल्ह्यात १ लाख क्विंटलहून अधिकच्या तुरीची खरेदी अनियमित पद्धतीने झाली आहे. त्यामुळे उशिराचे शहाणपण शेतकऱ्यांच्या अंगलट येण्याचे चित्र निर्माण झाले आहे.