पराभव मान्य, कारणे शोधून बोध घेऊ
By Admin | Updated: May 18, 2014 00:47 IST2014-05-18T00:21:07+5:302014-05-18T00:47:43+5:30
लातूर: लातूर लोकसभा निवडणुकीत पक्षाचा झालेला पराभव आम्हाला मान्य आहे. याची जबाबदारी मी आणि आमचे नेते स्वीकारीत आहोत.

पराभव मान्य, कारणे शोधून बोध घेऊ
लातूर: लातूर लोकसभा निवडणुकीत पक्षाचा झालेला पराभव आम्हाला मान्य आहे. याची जबाबदारी मी आणि आमचे नेते स्वीकारीत आहोत. या पराभवाची नेमकी काय कारणे आहेत याचा शोध घेणे चालू असून ती शोधून बोध घेऊन आम्ही पुढील काळात वाटचाल करु, असा विश्वास आ. अमित देशमुख यांनी शनिवारी येथील पत्रकार भवनात झालेल्या पत्र परिषदेत बोलताना व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, काँग्रेसचे पराभूत उमेदवार दत्तात्रय बनसोडे, अॅड. त्र्यंबकदास झंवर, महापौर स्मिता खानापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. नवनिर्वाचित खासदार सुनील गायकवाडांचे काँग्रेसकडून अभिनंदन करीत आ. देशमुख पुढे म्हणाले, संपूर्ण देशातील काँग्रेसचा पराभव विचार करायला लावणारा आहे. लातूरमध्ये भाजपाच्या विजयापेक्षा त्यांना मिळालेली अडीच लाखांची लिड आम्हाला आत्मपरिक्षण करायला लावणारी आहे. देशात जशी सत्ताधार्यांविरोधात लाट आली तशी स्थानिकलासुध्दा आमच्या विरोधात लाट गेली. अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर आम्ही पूर्वीही गंभीर होतो आणि आता जास्त गांभीर्याने पाहू. सर्वच मतदारसंघात भाजपाला जी लिड मिळाली त्याचा आम्हाला अंदाज आला नाही. लोकांचा अंदाज न आल्याने आमचा पराभव झाला. येणार्या १५ दिवसांत नेमके काय झाले आहे ? याचा आम्ही अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आमच्या कामात बदल करून आम्ही नव्याने उभे राहू़ काँग्रेस पक्ष हा परंपरा असलेला पक्ष आहे़ देशभरातच झालेली पडझड का झाली, याची चर्चा चालू आहे़ कार्यकर्त्यांना नव्याने बळ देऊन आत्मविश्वासाची गरज आहे़ कार्यकर्ते नव्या उमेदीने उभे राहतील, यात शंका नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी) राष्टÑवादीचे नेते सोबत होते : आ. देशमुख आम्हाला सोबत घेण्यात आले नाही, या राष्टÑवादीचे माजी खासदार जनार्दन वाघमारे यांच्या प्रतिक्रियेबाबत विचारले असता आमदार अमित देशमुख यांनी त्याचा इन्कार केला. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या आदेशाने राज्यात सगळीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांनी मिळून काम केले आहे़ लातुरातही असेच झाले असल्याचे सांगून जर त्यांना तसा अनुभव आला असेल तर त्याबाबत माहिती घेऊन बोलेन, असेही ते म्हणाले.