एसी बंद; रक्तपुरवठा थांबला !
By Admin | Updated: April 11, 2017 00:10 IST2017-04-11T00:09:59+5:302017-04-11T00:10:34+5:30
लातूर : सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीची वातानुकूलित यंत्रणा तीन दिवसांपासून बंद पडल्याने तेथून होणारा पीसीव्ही अंतर्गतचा रक्तपुरवठाच बंद झाला आहे.

एसी बंद; रक्तपुरवठा थांबला !
लातूर : चैत्रातच वैशाख महिन्यासारखा वनवा पेटला आहे. त्यामुळे जीवाची घालमेल होत आहे. परिणामी, रक्तदान करण्याचे प्रमाण घटले आहे. त्यातच शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीची वातानुकूलित यंत्रणा तीन दिवसांपासून बंद पडल्याने तेथून होणारा पीसीव्ही अंतर्गतचा रक्तपुरवठाच बंद झाला आहे. त्याचबरोबर शहरातील रक्तपेढ्यांमध्ये आवश्यकतेच्या तुलनेत रक्त पिशव्या उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू आहे.
सध्या परीक्षांचा कालावधी आहे. त्याचबरोबर वाढत्या उन्हामुळे काही रक्तदाते वगळता अन्य लोकांनी रक्तदानाकडे पाठच फिरविली आहे. परिणामी, शहरात गेल्या १५ दिवसांपासून रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाअंतर्गत रक्तपेढी आहे. तसेच एमआयटी, डॉ. भालचंद्र ब्लड बँक, अर्पण आणि माऊली ब्लड बँक अशा पाच रक्तपेढ्या आहेत. परंतु, या सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा पुरेसा साठा नाही. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयाअंतर्गतच्या रक्तपेढीतील वातानुकूलित व्यवस्था कोलमडली आहे. परिणामी, या रक्तपेढीतून होणारा रक्तपुरवठा बंद झाला आहे. वास्तविक पाहता या रक्तपेढीतून सर्वोपचारमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना, इतर खासगी रुग्णालयांत दाखल झालेल्या रुग्णांसाठी त्यांच्या नातेवाईकांनी रक्तदानाचे कार्ड दिल्यास मोफत रक्तपुरवठा केला जातो. त्याचबरोबर सर्वोपचारच्या नियमानुसार शुल्क घेण्याबरोबर एक रक्तदाता उपलब्ध झाल्यानंतर रक्त पिशवीचा पुरवठा केला जातो. परंतु, वातानुकूलित यंत्र बंद झाल्याने पीसीव्हीअंतर्गत रक्तपुरवठा बंद झाला आहे. या रक्तपेढीतून व्होल ब्लड उपलब्ध करून दिले जात आहे.