भांगसीमाता गडावरील जपानुष्ठान सोहळ्याची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 19:49 IST2018-10-18T19:48:49+5:302018-10-18T19:49:46+5:30
वाळूज महानगर : नवरात्र उत्सवानिमत्त भांगसीमाता गडावर आयोजित जपानुष्ठान सोहळ्याची श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरी महाराज यांच्या समाजप्रबोेधन कार्यक्रमाने बुधवारी उत्साहात सांगता करण्यात आली.

भांगसीमाता गडावरील जपानुष्ठान सोहळ्याची सांगता
वाळूज महानगर : नवरात्र उत्सवानिमत्त भांगसीमाता गडावर आयोजित जपानुष्ठान सोहळ्याची श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरी महाराज यांच्या समाजप्रबोेधन कार्यक्रमाने बुधवारी उत्साहात सांगता करण्यात आली.
शरणापूरलगत असलेल्या ऐतिहासिक भांगसीमाता गडावर दरवर्षी नवरात्र उत्सवानिमित्त जपानुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. १० आॅक्टोबरपासून भांगसीमाता गडावर आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांना पंचक्रोशीतील भाविकांनी अलोट गर्दी केली होती. बुधवारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व शेकडो भाविकांच्या उपस्थितीत स्वामीजींच्या कुटीपासून गडापर्यंत दिंडी काढण्यात आली.
स्वामी परमानंदगिरी महाराज म्हणाले की, प्रत्येकाच्या अंगी संस्कार असणे गरजेचे असून, यासाठी बालवयातच पालकांनी मुलांवर चांगले संस्कार करण्याची गरज आहे. बालवयात मुलांवर धार्मिक व आध्यात्मिक संस्कार रुजविले गेले, तर समाजाची प्रगती होऊन प्रत्येकाचे जीवन सुखी होईल. समाजाला दिशा देण्याचे काम साधू-संतांचे असून, विविध धार्मिक कार्यक्रमांतून जीवन चांगल्या पद्धतीने कसे जगावे, असा सल्ला साधू-संत देत असतात. सुखी जीवनासाठी प्रत्येकाने ओंकार, प्राणायाम, सोहम, अनुष्ठान व आध्यामिक मार्गाकडे वळण्याची गरज असल्याचे परमानंदगिरी महाराज यांनी सांगितले.
कार्यक्रमाला सोमेश्वर, महाराज, सतीश महाराज, ब्रह्मानंद महाराज, खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय सिरसाट, माजी खा. जयसिंगराव गायकवाड, भागवत कराड, बाळासाहेब गायकवाड, अनिल चोरडिया आदींसह बजाजनगर, रांजणगाव, जोगेश्वरी, तीसगाव, करोडी, शरणापूर, माळीवाडा, दौलताबाद सिडको, पंढरपूर, वळदगाव, पाटोदा, बकवालनगर, नायगाव, वाळूज आदी परिसरातील भाविकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.