दौलताबाद : अब्दीमंडी ते मोमीन आरिफ दर्गा रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. बारा महिन्यांपासून रस्त्यावर खडी पसरवून डांबरीकरण रखडले होते. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच या कामाला सुरुवात करण्यात आली.
मुख्यमंत्री ग्रामविकास सडक योजनेंतर्गत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग अर्थ साहाय्यातून अब्दीमंडी ते मोमीन आरीफ दर्गापर्यंत दीड किलोमीटर रस्ता दुरुस्तीचे भूमिपूजन ३ जानेवारी २०२० रोजी करण्यात आले होते. या कामाची किंमत ६६ लाख ९८ हजार रुपये इतकी होती. यात मुख्य रस्त्यापासून १०० मीटर सिमेंट काँक्रिट व उर्वरित डांबरीकरण करण्याचे काम आहे. ठेकेदाराने १०० मीटर काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण केले. मात्र, बाकी डांबरीकरणासाठी रस्त्यावर खडी टाकून ठेवली. तब्बल बारा महिन्यांपासून हे काम तसेच रखडून पडल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर प्रसिद्ध संत मोमीन आरिफ, मर्दानोदिन दर्गा, पीर याकूब यांच्या काही दर्गा आहेत. येथे औरंगाबाद, नाशिक, धुळे, मालेगाव, हैद्राबाद, मुंबई, गुलबर्गा आदी ठिकाणांहून भाविक दर्शनासाठी येतात. रस्ता खराब असल्याने त्यांचे हाल होत होते. यावर लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर संबंधित विभागाने डांबरीकरण सुरू केले आहे. यामुळे अब्दीमंडी येथील ग्रामस्थांनी लोकमतचे आभार मानले आहे.
फोटो : अब्दीमंडी ते मोमीन आरिफ दर्गा रस्त्याचे डांबरीकरण सुरू झाले आहे.