वैजापूर ( छत्रपती संभाजीनगर) : समृद्धी महामार्गावरून भरधाव वेगात जाणाऱ्या कारचा अचानक टायर फुटला. त्यानंतर कार अनियंत्रित होऊन उलटून झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. हा अपघात वैजापूर जवळून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर सायंकाळी ७ वाजता झाला.
प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डीच्या दिशेने एक कार समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होती. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वैजापूर जवळील चॅनल नंबर ४८० जवळ कारचे टायर गरम होऊन फुटले. त्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या भयानक अपघातात कारमधील एका महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी असल्याची माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह डॉक्टरांची टीम व असरा फाउंडेशन घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे सर्व प्रवासी मुंबईतील असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत करत असले तरी विविध कारणांनी अपघात सत्र सुरूच आहे.