रस्त्यावर पोलिसांच्या भरधाव कारने घेतला पेट, पोलीस आयुक्तालयासमोरील घटना
By राम शिनगारे | Updated: May 16, 2023 22:17 IST2023-05-16T22:16:33+5:302023-05-16T22:17:30+5:30
अग्निशमनच्या पथकाची घटनास्थळी धाव

रस्त्यावर पोलिसांच्या भरधाव कारने घेतला पेट, पोलीस आयुक्तालयासमोरील घटना
छत्रपती संभाजीनगर : उस्मानपुरा पोलिस ठाण्यातुन पोलिस आयुक्तालय परिसरातील क्वॉटर्रमधील घरी जात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कारने आयुक्तालयाच्या समोरच पेट घेतला. पोलिस कर्मचाऱ्याने गाडीतुन खाली उतरून तात्काळ अग्नीशमन विभागाला फोन केला. काही मिनिटाच अग्नीशमनची गाडी पोहचली. त्यांनी आग बुझविण्याचे काम केले. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.
उस्मानुपरा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले अंमलदार रविंद्र देविदास ठाकरे हे ड्युटी संपवून पोलिस आयुक्तालय परिसरातील निवासस्थानी स्वीफ्ट कारने (एमएच २० एफजी ९१८१) घरी जात होते. पोलिस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराजवळच्या गतीरोधकाच्या अलीकडे गाडी आली असताना त्यांना बोनेटमधून धुर निघत असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी तात्काळ बाजूला घेऊन गाडी थांबवली. तोपर्यंत गाडीने पेट घेतला. त्यांनी तात्काळ अग्नीशनम विभागाला फोन केला. काही वेळातच अग्नीशमनची गाडी आली. ड्युटी अधिकारी लक्ष्मण कोल्हे, जवान शेख तनवीर, संग्राम मोरे, शेख आमेर, शेख समीर, शिवसंभा कल्याणकर, मयुर नरके आणि मोहम्मद दुशाज यांनी गाडीच्या समोरील भागात लागलेली आग शमविण्याचे काम केले. या घटनेची नोंद बेगमपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. गाडीचा समोरून चालकाच्या सिटपर्यंतचा सर्व भाग जळून खाक झाल्याची माहिती पोलिस अंमलदार रविंद्र ठाकरे यांनी दिली.