एक दिवसाचा पगार बळीराजासाठी! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय
By बापू सोळुंके | Published: June 22, 2023 01:43 PM2023-06-22T13:43:29+5:302023-06-22T13:44:03+5:30
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसाची वेतन कपात
छत्रपती संभाजीनगर : गतवर्षी संततधार आणि अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर रब्बी आणि उन्हाळी पिकांचेही अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान केल्याने शेतकरी त्रस्त आहे. या शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही शासनाने दिली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यामुळे सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना जून महिन्याचा पगार कमी मिळेल.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसाची वेतन कपात : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
२६ कोटी ९७ लाख ४३ हजार ९० रुपयांचे नुकसान
एप्रिल महिन्यात जिल्ह्यात पडलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगाम आणि उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले. गहू काळा पडला, भाजीपाला आणि फळबागांचेही मोठे नुकसान झाले. अवकाळीमुळे जिल्ह्यात सुमारे १६ हजार १४८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीसाठी प्रशासनाने २६ कोटी ९७ लाख ४३ हजार ९० रुपयांची मागणी शासनाकडे केली.
शासनाच्या निर्णयाचे स्वागत
नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या वर्षीपासून शेतकऱ्यांचे सतत नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनातून एक दिवसाचा पगार कपात केला जाईल. बळीराजा जगाचा पोशिंदा आहे. यामुळे शासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
- परेश खोसरे, जिल्हाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना.
सामाजिक उपक्रमात अग्रेसर
बळीराजाला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक दिवसाचे वेतन देण्यास आमच्या कर्मचाऱ्यांनी हरकत घेतली नाही. संघटनेनेच असा प्रस्ताव शासनास दिला होता. कोणत्याही सामाजिक उपक्रमासाठी सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेेचे कर्मचारी योगदान देतात.
- डॉ. देविदास जरारे, राज्य उपाध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना.
पेरणीपूर्व मदत द्यावी
वर्षातून तीन वेळा नुकसान झाल्यानंतर एखाद्या वेळेस शासनाकडून भरपाई; तीसुद्धा तोकडी मिळते. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन घेत असल्याचे कळते, ही चांगली बाब आहे. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये द्यायला हवेत.
-कृष्णा पवार, शेतकरी, पिंप्री राजा.