वादळी वाऱ्यात जखमी बाल फुटबॉलपटूचा पाय कापावा लागला, तरीही आयुष्याची मॅच हरला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 11:54 AM2024-04-23T11:54:02+5:302024-04-23T11:54:28+5:30

छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्याचा तिसरा बळी; फुटबाॅलपटू दक्षची मृत्यूशी झुंज अपयशी

A child footballer injured in a storm had to have his leg amputated, but lost the match of his life | वादळी वाऱ्यात जखमी बाल फुटबॉलपटूचा पाय कापावा लागला, तरीही आयुष्याची मॅच हरला

वादळी वाऱ्यात जखमी बाल फुटबॉलपटूचा पाय कापावा लागला, तरीही आयुष्याची मॅच हरला

छत्रपती संभाजीनगर : वादळी वाऱ्यामुळे पत्रा उडून गंभीर जखमी झालेला ८ वर्षीय दक्ष अभय वारे याची तब्बल ४३ तास मृत्यूशी चाललेली झुंज अखेर अपयशी ठरली. उपचार सुरू असताना रविवारी रात्री २ वाजेच्या सुमारास त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. फुटबाॅलच्या मॅचमध्ये चमकदार कामगिरी करीत सर्वांची मने जिंकणारा दक्ष आयुष्याची मॅच हरल्याने एकच हळहळ व्यक्त झाली.

शहरात शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्याचा दक्ष हा तिसरा बळी ठरला. शहानूरमियाँ दर्गाह परिसरात शनिवारी सायंकाळी दक्ष (रा. पन्नालालनगर) हा नेहमीप्रमाणे फुटबाॅल क्लाससाठी गेला होता. वातावरणात अचानक बदल झाला आणि जोरदार वारे वाहू लागले. सर्व मुलांनी सुरक्षित जागेकडे धाव घेतली. दक्षनेही धाव घेतली. मात्र, त्याच वेळी वादळी वाऱ्याने पत्रा उडून त्याच्या डोक्याला, हाताला आणि पायाला लागल्याने गंभीर दुखापत झाली. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. शस्त्रक्रियेदरम्यान त्याचा पाय मांडीपासून कापावा लागला. पाय गेला तर गेला, दक्ष सुखरूपपणे या सगळ्यातून बाहेर पडावा, अशीच प्रार्थना दक्षला वाचविण्यासाठी प्रत्येक जण करीत होता. मात्र, उपचार सुरू असताना दक्षचा मृत्यू झाल्याची माहिती डाॅ. प्रफुल्ल पांडे यांनी दिली.

अंत्यविधीला गर्दी, अश्रूंचा फुटला बांध
दक्षने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराला कळली आणि सर्वांना एकच धक्का बसला. दक्षच्या पार्थिवावर कैलासनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाईकांसह दक्षला रुग्णालयात दाखल करणाऱ्यांपासून ते उपचारासाठी प्रयत्न करणाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.

मुलांना कसे सांगणार, दक्ष गेला?
दक्षच्या अनेक मित्रांचे कुटुंब अंत्यविधीला आले होते. दक्ष हा फुटबाॅलसह मित्रांबरोबर क्रिकेट, बॅडमिंटनही खेळत असे. दक्ष हा सर्वांना सोडून गेला, हे मुलांना कसे सांगायचे, असा प्रश्न अनेकांना पडला होता.

Web Title: A child footballer injured in a storm had to have his leg amputated, but lost the match of his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.