छत्रपती संभाजीनगर : बालविवाह प्रकरणी मामा, मामी, नवरा मुलगा, सासू-सासरे, मंडपवाले, आचारी, भटजी आणि उपस्थित वऱ्हाडीमंडळी अशा एकूण १५८ जणांवर गंगापूर पोलिस ठाण्यात राहुल चराटे यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. सदरील बालिकेला बालकल्याण समितीच्या आदेशानुसार विद्यादीप बालगृहात ठेवण्यात आले आहे.
महिला व बाल विकास विभागातील कायदा व परीविक्षा अधिकारी सुप्रिया इंगळे यांनी सांगितले की, आईचे निधन झालेले. वडील भोळसर. अशा परिस्थितीत मामानेच भाचीचा सांभाळ केला. मात्र, भाची १५ वर्षे ६ महिन्यांची असतानाच गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथे १३ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी पैठण तालुक्यातील बालानगरच्या २३ वर्षीय युवकासोबत तिचा विवाह लावण्यात आला. मुलगी सासरी गेल्यानंतर पहिल्या रात्रीच पतीने संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अल्पवयीन मुलीला सहन न झाल्यामुळे ती चक्कर येऊन पडली.
मात्र, नातेवाइकांनी हळदीच्या अंगाची नवरी असल्यामुळे कोणीतरी भानामती केल्याचा संशय व्यक्त केला. त्यानुसार बीड जिल्ह्यात मढी येथील एका मांत्रिकाकडे अल्पवयीन मुलीवर दीड ते दोन महिने उपचार करण्यात आले. त्याचदरम्यान महिला सुरक्षा संघटनेच्या जयश्री घावटे- ठुबे यांनी चाइल्ड हेल्पलाइनवर संपर्क करीत घटनेची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला दिली. त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा चिमद्रे यांच्या नेतृत्वाखाली लग्न लावलेल्या मुलीचा शोध सुरू केला. बालानगर येथे १६ फेब्रुवारी रोजी मुलगी आल्याची माहिती समजताच एमआयडीसी पैठण पोलिसांच्या मदतीने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महादेव डोंगरे, सुप्रिया इंगळे, दीपक बजारे, आम्रपाली बोर्डे, यशवंत इंगोले, राहुल चराटे यांच्या पथकाने छापा मारून मुलीचा ताबा घेतला.
बाल विकास विभागाकडे संपर्क साधावामुलगी अनाथ असेल, पालक मुलीचा सांभाळण्यास असक्षम असतील, तर महिला बाल विकास विभागाकडे संपर्क साधावा. बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार बालिकांचे संरक्षण व संगोपन करण्यात येईल.- रेश्मा चिमद्रे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी