मकबरा येथील ९ अनधिकृत दुकाने जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:07 IST2021-01-08T04:07:13+5:302021-01-08T04:07:13+5:30
औरंगाबाद : ऐतिहासिक बीबीका मकबरा परिसरात अनधिकृतपणे बांधलेल्या ९ दुकानांचे अतिक्रमण मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारी जमीनदोस्त ...

मकबरा येथील ९ अनधिकृत दुकाने जमीनदोस्त
औरंगाबाद : ऐतिहासिक बीबीका मकबरा परिसरात अनधिकृतपणे बांधलेल्या ९ दुकानांचे अतिक्रमण मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारी जमीनदोस्त केले. भारतीय पुरातत्त्व विभागाने वर्षभरापूर्वी महापालिकेला पत्र लिहून कारवाई करण्याची विनंती केली होती.
जिल्हाधिकारी कार्यालय व पुरातत्त्व विभागाच्या अधीक्षकांनी १४ डिसेंबर २०१९ रोजी जयराज कमलाकर पांडे यांनी केलेले अतिक्रमण व अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात मनपाला कळविले होते. महापालिकेने इतर तक्रारींप्रमाणे या तक्रारीकडेही प्रारंभी दुर्लक्ष केले. भारतीय पुरातत्त्व विभागाने यासंदर्भात पाठपुरावा सुरूच ठेवला. त्यानंतर महापालिकेने कागदी घोडे नाचविण्यास सुरुवात केली.
मनपाने अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी सोमवारी जागेची पाहणी करून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार मंगळवारी अतिक्रमण हटाव पथकाने बीबीका मकबरा परिसरात अनधिकृतपणे बांधलेले ९ दुकानांचे अतिक्रमण हटविले, तसेच मुकुंदवाडी भागातील रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या भाजीमंडईचे अतिक्रमण हटविण्यात आले. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने यापूर्वी किमान दहा वेळेस अशी कारवाई केली आहे. ही कारवाई पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, आर.एस. राचतवार, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, रवींद्र देसाई, पी. बी. गवळी यांच्यासह मनपा अतिक्रमण हटाव पोलीस पथक कर्मचाऱ्यांनी केली.
फोटो