९८००० मेट्रीक टन खत मंजूर
By Admin | Updated: June 2, 2014 00:50 IST2014-06-02T00:43:46+5:302014-06-02T00:50:30+5:30
भास्कर लांडे, हिंगोली मृग नक्षत्र एका आठवड्यावर आल्याने खरीप हंगामासाठी लागणार्या खत बियाण्यांच्या खरेदीला सुरूवात झाली आहे.
९८००० मेट्रीक टन खत मंजूर
भास्कर लांडे, हिंगोली मृग नक्षत्र एका आठवड्यावर आल्याने खरीप हंगामासाठी लागणार्या खत बियाण्यांच्या खरेदीला सुरूवात झाली आहे. मागील दोन वर्षांत सर्वच खतांचे भाव वाढले असताना युरियाचा भाव स्थिर आहे. म्हणून यंदा युरिया आणि डीएपी खतांच्या पुरवठ्यावर शंका उपस्थित झाल्याने तुटवड्याची शक्यता आहे. उर्वरित खतांचा तुटवडा जाणवणार नाही. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख २० हजार २६ मेट्रीकटन खताची आवश्यकात भासणार आहे; परंतु ९८ हजार खत मंजूर झाले आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ४ लाख ५२ हजार ६०० हेक्टर आहे. त्यातील ३ लाख ७९ हजार ४६८ हेक्टर लागवड लायक क्षेत्र आहे; पण ३ लाख ४० हजार ५०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र कृषी विभागाने निश्चित केले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी हिंगोलीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मागील दोन वर्षांत हिंगोलीने पावसाच्या बाबतीत आघाडी घेतली आहे. उत्पादनाच्या बाबतीत जिल्हा गतवर्षी मागे सरकला. जिल्ह्याच्या पीक पद्धतीत मोठ्या प्रमाणात फेरबदल पहावयास मिळाले. गतवर्षीपेक्षा यंदा अधिक बदल प्रामुख्याने नगदी पिकांत पहावयास मिळणार आहेत. अगदी तसे खतांबाबत होणार नसले तरी यंदा युरिया आणि डीएपी खतांची मागणी अधिक दिसते. शासनाने जवळपास सर्वच खतांवरील सबसिडी उठविल्यामुळे मागील दोन वर्षांत खतांचे भाव वधारले आहेत. कंपन्या सोयीप्रमाणे भाववाढ करीत असल्यामुळे खत खरेदीवेळी उत्पादकांचे कंबरडे मोडत आहे; परंतु युरिया खतांवरील सबसिडी कायम ठेवल्यामुळे त्याचे भाव स्थिर आहेत. बाजारात आज पावणेतीनशे रूपयांच्या घरात युरियाचे ५० किलोचे पोते मिळत आहे. प्रत्येक पिकांच्या वाढीसाठी नत्राची उपयुक्तता असल्यामुळे युरियाची मागणी असते. म्हणून यंदाच्या खरीप हंगामासाठी २८ हजार ४६७ मेट्रीक टन खतांची प्रस्तावित मागणी आहे; पण २३ हजार ९०० मेट्रीक टन खत मंजूर झाल्याने युरिया खताचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. दुसरीकडे डीएपी खतालाही उत्पादकांची पसंती असल्यामुळे खरीप हंगामासाठी १४ हजार १२६ मेट्रीक टनाची मागणी आहे. तेवढा पुरवठा मंजूर झाला नसून या हंगामात ९ हजार ८०० मे.टन खत देण्यात येणार आहे. यंदा याही खताचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातील सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) वगळता सर्वच खतांना मागणीपेक्षा कमी मंजुरी मिळाली; परंतु एसएसपीची ८ हजार २०० मे.टनाची आवश्यकता असताना दुपटीनेच म्हणजे १६ हजार ३०० मे.टन खताची मंजुरी मिळाली आहे. उत्पादकांची मागणी असलेल्या १०:२६:२६ १२ हजार मागणी असताना ८ हजार १००, २०:२०:०० ची १० हजार २०० पैकी ६ हजार ८००, १६:२०:०:१३ ची १० हजार २०० पैकी ८ हजार २०० मेटन खतांची मंजुरी मिळाली आहे. रासायनिक खतांची दिवसेंदिवस मागणी वाढत असताना तेवढा पुरवठा होत नाही. त्यातही आवश्यक खतांचा तुटवडा प्रतिवर्षी जाणवत आहे. भाववाढीची शक्यता असल्याने आताच खत खरेदी करणे फायद्याचे राहणार आहे. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख २० हजार २६ मेट्रीक टन खताची आवश्यकता आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी २८ हजार ४६७ मेट्रीक टन खताची मागणी प्रस्तावित आहे. खरीप हंगामातील स्गििंल सुपर फॉस्फेट (एसएसपी) वगळता सर्वच खतांना कमी मंजुरी.