बनावट स्वाक्षऱ्या करून बहिणीच्या घरावर उचलले ९३ लाखांचे कर्ज; लहान बहिणीविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 16:22 IST2018-05-25T16:06:26+5:302018-05-25T16:22:19+5:30
६० वर्षीय मोठ्या बहिणीचे घर बँकेकडे तारण ठेवून त्यांच्या परस्पर ९२ लाख ९५ हजार ६७३ रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक करणाऱ्या लहान बहिणीविरोधात वेदांतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

बनावट स्वाक्षऱ्या करून बहिणीच्या घरावर उचलले ९३ लाखांचे कर्ज; लहान बहिणीविरुद्ध गुन्हा दाखल
औरंगाबाद : ६० वर्षीय मोठ्या बहिणीचे घर बँकेकडे तारण ठेवून त्यांच्या परस्पर ९२ लाख ९५ हजार ६७३ रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक करणाऱ्या लहान बहिणीविरोधात वेदांतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले करीत आहेत.जयश्री नवनाथ सोमासे (४५, रा. बजाजनगर) असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.
अधिक माहिती देताना वेदांतनगर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार आशाबाई चंद्रभान निमसे (६०, रा. कासलीवाल तारांगण, मिटमिटा) आणि आरोपी जयश्री या दोघी बहिणी आहेत. तक्रारदार यांच्या पतीचे बारा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. दोघी बहिणींनी १९९९ साली एमआयडीसीकडून ४ हजार ७०० चौरस फुटांचा भूखंड खरेदी केला होता. यापैकी तक्रारदार यांच्या नावे २ हजार ३५० चौरस फूट जागा आहे. या भूखंडावर तक्रारदार यांनी एमआयडीसीकडून परवानगी घेऊन दोन घरे बांधलेली आहेत.
१० जानेवारी २००६ रोजी त्यांच्या घराचे स्वतंत्र खरेदीखतही केलेले आहे. ३ सप्टेंबर २०१७ रोजी तक्रारदार अदालत रोडवरील देना बँकेत गेल्या असता त्यांच्या घरावर कर्ज असल्याचे बँक व्यवस्थापक सिन्हा यांनी त्यांना सांगितले होते. नंतर त्यांनी या कर्जाविषयी अधिक चौकशी आणि खात्री केली असता, त्यांचीच लहान बहीण जयश्री सोमासे यांनीच तिच्या आणि तक्रारदार यांच्या भूखंडावर ९२ लाख ९५ हजार ६७३ रुपये कर्ज घेतल्याचे समजले. विशेष म्हणजे हे कर्ज घेताना जयश्री यांनी तक्रारदार यांची परवानगी घेतली नाही. एवढचे नव्हे तर तत्कालीन बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून त्यांनी या कर्जासाठी जामीनदार म्हणून कागदपत्रावर खोटी सही केली.
जाब विचारताच दिली जिवे मारण्याची धमकी
जयश्री यांनीच परस्पर आपल्या घरावर कर्ज घेतल्याचे समजताच आशाबाई यांनी त्यांना याविषयी जाब विचारण्यासाठी गेल्या. तेव्हा जयश्री यांनी त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, असे आशाबार्इंनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले. लहान बहिणीनेच आपली फसवणूक केल्याचे समजताच आशाबाईने त्यांच्याविरोधात थेट उस्मानपुरा पोलीस ठाण्यात २३ मे रोजी तक्रार दाखल केली. जयश्री यांनी परस्पर आणि बनावट सही करून आपल्या घरावर कर्ज उचलून फसवणूक केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले करीत आहेत.