पोलिस भरती प्रक्रियेत ८८ उमेदवार अपात्र
By Admin | Updated: June 7, 2014 00:27 IST2014-06-06T23:27:32+5:302014-06-07T00:27:19+5:30
हिंगोली : जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलिस शिपायांच्या ६७ जागांसाठी ६ जूनपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
पोलिस भरती प्रक्रियेत ८८ उमेदवार अपात्र
हिंगोली : जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलिस शिपायांच्या ६७ जागांसाठी ६ जूनपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी ६५० पुरूष उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ४७६ उमेदवार हजर झाल्याने त्यांची कागदपत्रे पडताळणी करून उंची- छातीचे मोजमाप घेण्यात आले. या प्रक्रियेत पहिल्या दिवशी ८८ उमेदवार अपात्र ठरले आहेत.
येथील संत नामदेव कवायत मैदानावर पोलिस भरती प्रक्रियेसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने सकाळी लवकरच ही प्रक्रिया घेण्यात येत आहे. पहिल्या दिवशी ६५० उमेदवारांना सकाळी ६ वाजता मैदानावर हजर राहण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यापैकी ४७६ जण मैदानावर पोहोचले. पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी- कर्मचाऱ्यांनी भरती प्रक्रियेला सुरूवात केली. या प्रक्रियेसाठी गृहपोलीस उपअधीक्षक रामराव हाके, हिंगोली शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश मोरे, वसमतचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांच्यासह पोलिस निरीक्षक शंकर सिटीकर, शिंदे, रावसाहेब भापकर, लक्ष्मण केंद्रे, लक्ष्मण फुलझळके, नानासाहेब नागदरे, दिलीप थोंबळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजमोहन जाधव, अशोक जाधव, आडे यांच्यासह २०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना ओळखपत्र देण्यात आले असून भरती प्रक्रियेच्या कामादरम्यान कोणत्याही अधिकारी- कर्मचाऱ्यांना मोबाईल वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
पहिल्या दिवशीची प्रक्रिया पूर्ण झाली असून यामध्ये उंची-छाती मोजमाप तसेच कागदपत्र पडताळणीमध्ये ८८ उमेदवारांना भरतीसाठी अपात्र ठरविण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी दिली. त्यांना चेस्ट क्रमांक देण्यात आले असून शारीरिक चाचणीसाठी ११ जूनपासून बोलावण्यात येणार आहे. दरम्यान, ७ व ८ जून रोजी दोन्ही दिवशी प्रत्येकी ६५० उमेदवारांना बोलावण्यात आले आहे. ९ जून रोजी महिला उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी येण्याबाबत कळविण्यात आले आहे. ६ ते ८ जून दरम्यान ज्या उमेदवारांना आवेदनपत्र भरूनही प्रवेशपत्र मिळाले नाही किंवा इतर कारणास्तव ते प्रक्रियेसाठी हजर राहू शकले नाही, अशा उमेदवारांना १० जून रोजी आणखी एक संधी देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)