बचत करून वृद्धेकडे ७८ हजार जमले, बँकेतून काढून बसने गावी जाताना चोरट्यांनी पळविले
By हरी मोकाशे | Updated: July 26, 2023 18:50 IST2023-07-26T18:48:21+5:302023-07-26T18:50:32+5:30
उदगीर बसस्थानकातील घटना, शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

बचत करून वृद्धेकडे ७८ हजार जमले, बँकेतून काढून बसने गावी जाताना चोरट्यांनी पळविले
उदगीर : बचत गटाच्या खात्यावर जमा झालेले पैसे उचलून गावाकडे जाण्यासाठी बसस्थानकात आलेल्या एका वृद्ध महिलेच्या पर्समधील ७८ हजार रुपये चोरट्याने पळविल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ४.३० वा. च्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील तोगरी येथील ताहेराबी मैनुद्दीन शेख या आपल्या नातीसमवेत उदगीरला आल्या होत्या. त्यांनी शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतून बचत गटाचे जमा झालेले ७८ हजार रुपये उचलले. त्यानंतर त्या गावाकडे जाण्यासाठी बसस्थानकात आल्या. त्या बसमध्ये बसून गावाकडे निघाल्या असता तिकिटासाठी पैशाची पर्स उघडली. तेव्हा बँकेतून उचललेली रक्कम गायब झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी वृध्द महिलेची नात अस्मा कलीम शेख हिच्या फिर्यादीवरून मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.