जिल्ह्यातील ७७ प्रकल्प कोरडेठाक
By Admin | Updated: August 26, 2014 00:28 IST2014-08-26T00:28:04+5:302014-08-26T00:28:04+5:30
उस्मानाबाद : पावसाळा संपत आला तरी जिल्ह्यात अद्याप एकही मोठा पाऊस झालेला नाही. अत्यल्प पावसावरच बहुतांश भागात शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या असून

जिल्ह्यातील ७७ प्रकल्प कोरडेठाक
उस्मानाबाद : पावसाळा संपत आला तरी जिल्ह्यात अद्याप एकही मोठा पाऊस झालेला नाही. अत्यल्प पावसावरच बहुतांश भागात शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या असून, दुसरीकडे पावसाअभावी जिल्ह्यातील लहान मोठे मध्यम ७७ प्रकल्प कोरडेठाक आहेत. ९६ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील अनेक गावांत पाणीटंचाई जाणवत असून, येत्या काही दिवसांत मोठा पाऊस नाही झाल्यास या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन वर्षापासून पावसाच्या प्रमाणात कमालीची घट झाल्याने विहिरी, विंधन विहिरीची पाणीपातळी कमालीची घटत चालेली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यातील १९२ गावात तीव्र तर ५०३ मध्यम स्वरुपांची पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पावसाळा सुरु असतानाही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पाणी साठ्यात अपेक्षीत वाढ झालेली नाही. पावसाअभावी तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेल्यात जमा असून, खरीप पिके व पाणीटंचाईची परिस्थितीही गंभीर बनली आहे.जिल्ह्यात एक मोठा, सतरा मध्यम तर १९३ लघु प्रकल्प व साठवण तलाव आहेत.
जिल्ह्यातील एकमेव मोठा असलेल्या सीना-कोळेगाव प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे. सतरा मध्यप्रकल्पांपकी केवळ एका प्रकल्पात २५ ते ५० टक्के पाणी साठा, सहा प्रकल्पात २५ टक्के पेक्षा कमी तर सहा जोत्याखाली तर चार कोरडे पडले आहेत. जिल्ह्यात ९१३ लघु प्रकल्प असून, यातील केवळ २ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत, तसेच चार प्रकल्पात ५१ ते ७५ टक्के पाणीसाठा, २५ प्रकल्पात २५ टक्के पेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक आहे. ८९ प्रकल्प जोत्याखाली तर ७३ प्रकल्प कोरडे पडले असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
सद्यस्थितीत कळंब तालुक्यातील रायगव्हाण, परंडा तालुक्यातील चांदणी, खंडेश्र्वर, साकत, मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. लघु प्रकल्पामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी, कोलेगाव, करजखेडा, घुगी, येवती, टाकळी , केशेगाव, सांजा, जागजी, आळणी, बेंबळी, गोपाळवाडी, पाडोळी (आ), बोगरगाव राजे, धुत्ता, कोंड , तुळजापूर तालुक्यातील कुनसावळी, सलगरा मडडी, व्होर्टी, केमवाडी, खुदावाडी, कदमवाडी, केशेगाव, फुलवाडी, बंचाई, गंजेवाडी, ढेकरी, खंडाळा, येडोळी, चिकुंद्रा, उमरगा तालुक्यातील कसमलवाडी, कोरगाववाडी, केसरजवळगा, कून्हाळी, अलूर, सुपतगाव, पेंठ सागवी, सरोडी, कालनिंबाळा, बलसुर, कोराळ, जेवळी, गुंजोटीवाडी, लोहारा तालुक्यातील माळेगाव, कळंब तालुक्यातील देवधानोरा, शिराढोण, कोठाळवाडी, ढोराळा, भाटसांगवी, आडसुळवाडी, नागुलगाव, बारातेवाडी, येडेश्र्वरी, भूम तालुक्यातील बागलवाडी, गोरमाळा, हिवरडा, गिरलगांव, घुलेवाडी, डुककरवाडी, उमाचीवाडी, जांब, तर वाशी तालुक्यातील दहिफळ, हातोला तर पंरडा तालुक्यातील अनाळा, सोनारी, अंबी, जेजली, मुगाव, तित्रज , तांबेवाडी, शेळगाव व वाटेफळ हे लघु प्रकल्प अद्यापही कोरडेच राहिले आहेत. (प्रतिनिधी)