७४ शाळांमध्ये ‘ऐकू ध्यानाने, लिहू आनंदाने’
By Admin | Updated: August 4, 2014 00:49 IST2014-08-04T00:32:40+5:302014-08-04T00:49:55+5:30
वाशी : तालुक्यातील जवळपास ७४ शाळांमध्ये ‘ऐकू ध्यानाने, लिहू आनंदाने’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे

७४ शाळांमध्ये ‘ऐकू ध्यानाने, लिहू आनंदाने’
वाशी : तालुक्यातील जवळपास ७४ शाळांमध्ये ‘ऐकू ध्यानाने, लिहू आनंदाने’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सदरील उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होण्यास मदत होत असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येते.
शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना नेहमीच कामाला अधिक प्रभावी व प्रवाही करण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांची गरज असते. शिक्षण प्रक्रिया आनंददायी व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी प्रत्येक शाळेने किमान एक तरी उपक्रम राबविणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश शाळांकडून हा कटाक्ष पाळला जात नसल्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर बीइओ कादर शेख यांनी या कामी पुढाकार घेत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे ७४ शाळांमध्ये ‘ऐकू ध्यानान, लिहू आनंदाने’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचे पालकांसोबतच शिक्षणप्रेमींतून स्वागत होत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्याना शैक्षणिक ज्ञानाबरोबर स्पर्धात्मक परीक्षेबाबत प्राथमिक धडेही मिळू लागले आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची वृत्ती निर्माण व्हावी, मुलभूत कौशल्य प्राप्त होऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात समरस होता यावे, वाचता-लिहता यते, संख्या वाचन-लेखन व गणिती मुलभूत क्रिया करता यावे, मुलभूत कौशल्य विकसित होवून अध्यायनातील अनुशेष भरून निघावा आणि प्रभूत्व अध्यानाकडे वटचाल व्हावी या सर्व बाबींचा विचार करून हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे बीइओ शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)
उपक्रमाची उद्दिष्टे
विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमता (श्रवण, भाषण, वाचन, लेखन ) विकसित करणे.
गणित विषयाची भीती दूर करणे.गणिाततील मुलभूत क्रियांची दैनंदिन व्यवहाराशी सांगड घालणे.
इंग्रजी विषयाची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करून त्याच्या आकलन क्षमतेनुसार त्यांची इंग्रजी विषयाची संपादणूक पातळी वाढवणे.
श्रुतलेखन व गणिती क्रियामध्ये आवड निर्माण करणे.
अप्रगत विद्यार्थ्यांमध्ये श्रुतलेखनासाठी आत्मविश्वास निर्माण करणे.
अचूकतेकडून विद्यार्थ्यांना हस्ताक्षर सुधारण्याकडे घेऊन जाणे.
सहकार्य व समन्वयाची भावना वाढवणे.
शालेय वेळापत्रकाप्रमाणे परिपाठ पूर्ण झाल्यानंतर १०.३० ते १०.४५ या वेळेत सदर उपक्रम दररोज १५ मिनिटे प्रत्येक वर्गात घेतला जातो.
उपक्रमाच्या शालेय स्तरावरील नोंदीनुसार कालावधी पूर्ण झाल्यांनतर मुल्यमापन व उपक्रमाचे निष्कर्ष काढले जाणार आहेत.
शिक्षकांनी ठेवावयाचे अभिलेखे व दैनंदिन टाचण वहीमध्ये सुरूवातीस एका ओळीचे (शब्द उदाहरणे) नोंद करण्यात येणार आहे. तसेच सातत्यपूर्ण सर्वंकष नोंदवहीच्या शेवटच्या पानावर विद्यार्थ्यांचे केवळ गुण घेतले जाणार आहेत.
विद्यार्थ्याचे लेखन व उदाहरणे शिक्षकांनी अथवा गटप्रमुख विद्यार्थ्यांकडून नियमित तपासण्यात येणार आहे.