विद्यापीठाच्या अधिसभेसाठी ७०, विद्या परिषदेसाठी १९ उमेदवार रिंगणात
By योगेश पायघन | Updated: December 8, 2022 18:12 IST2022-12-08T18:11:58+5:302022-12-08T18:12:31+5:30
४ जिल्ह्यांत ४,२०५ मतदार असून १७ केंद्रांवर ३१ जागांसाठी मतदान होणार आहे

विद्यापीठाच्या अधिसभेसाठी ७०, विद्या परिषदेसाठी १९ उमेदवार रिंगणात
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दुसऱ्या टप्प्यातील अधिसभा व विद्या परिषद निवडणुकीची तयारी प्रशासनाने पूर्ण केली असून बुधवारी दुसरे प्रशिक्षणही पूर्ण झाले. प्रत्यक्ष ३१ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी ४,२०५ मतदार आहेत. ४ जिल्ह्यांतील १७ मतदान केंद्रांवर १८ बुथवर शनिवारी (दि. १०) मतदान होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी, कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत अधिसभेच्या २९ तर विद्या परिषदेच्या ८ जागांची तसेच ३८ अभ्यास मंडळांची निवडणूक प्रक्रिया कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या सर्व जागांसाठी शनिवारी सकाळी ८ ते ५ दरम्यान मतदान होईल. अधिसभेच्या २५ व विद्या परिषदेच्या ६ जागांसाठीच प्रत्यक्ष मतदान होईल. दोन्ही गटांत ३ जागा बिनविरोध निवडून आल्या. ३ जागा रिक्त आहेत. १७ केंद्रे तर १८ बुथ असतील. प्रत्येक बुथवर निवडणूक केंद्राध्यक्षासह ७ जणांची नियुक्ती असेल. यामध्ये १४० प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, सल्लागार समिती सदस्य यांच्या उपस्थितीत बुधवारी महात्मा फुले सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक विभागाचे उपकुलसचिव डॉ. विष्णू कऱ्हाळे, अर्जुन खांड्रे, संजय लांब आदी उपस्थित होते.
जिल्हानिहाय केंद्रे :
औरंगाबाद : जिल्ह्यात विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग, सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, कन्नड येथील शिवाजी महाविद्यालय, वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालय आणि पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालय
बीड : केएसके महाविद्यालय, अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, आष्टीचे भगवान महाविद्यालय, माजलगावचे सिद्धेश्वर महाविद्यालय, केजचे बाबूराव आडसकर महाविद्यालय
उस्मानाबाद : विद्यापीठ उपपरिसर, तुळजापूरचे तुळजाभवानी महाविद्यालय, कळंबचे ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, उमरगा येथील आदर्श महाविद्यालय, परंडा येथील रा. गो. शिंदे महाविद्यालय
जालना : जेईएस महाविद्यालय, घनसावंगी येथील मॉडेल कॉलेज
अधिसभा
विद्यापीठ शिक्षक - ३ जागा, ९ उमेदवार, १२८ मतदार
संस्थाचालक : ४ जागा, ८ उमेदवार, १६९ मतदार
प्राचार्य : ८ जागा, १४ उमेदवार, ७८ मतदार
महाविद्यालयीन शिक्षक : १० जागा, ३९ उमेदवार, २ हजार ५८७ मतदार
विद्या परिषद - ६ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत. या प्रवर्गासाठी विद्यापीठ शिक्षक तसेच महाविद्यालयीन शिक्षक असे दोन्ही मतदार असतील.