७ कैदी एकाच ठिकाणी; एसबीओएमध्ये तात्पुरते कारागृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:06 IST2021-04-30T04:06:11+5:302021-04-30T04:06:11+5:30
औरंगाबाद : हर्सूल कारागृहात एकाच बराकीत ७ कैदी ठेवल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या पाहणीत समोर आल्यानंतर त्या ...

७ कैदी एकाच ठिकाणी; एसबीओएमध्ये तात्पुरते कारागृह
औरंगाबाद : हर्सूल कारागृहात एकाच बराकीत ७ कैदी ठेवल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या पाहणीत समोर आल्यानंतर त्या सर्वांना तातडीने वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश कारागृह प्रशासनाला त्यांनी दिले. तसेच एसबीओए शाळेत तात्पुरते कारागृह सुरू करण्यासाठी परवानगी दिली.
जिल्हाधिकारी चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी गुरुवारी हर्सूल कारागृहाची पाहणी केली. तेथील रुग्ण कैद्यांची व्यवस्था, आरोपींना कसे ठेवलेले आहे, याची पाहणी करताना कैद्यांशी संवाद साधला. एका गुन्ह्यातील ७ कैदी एकत्र होते, त्यातील एक औरंगाबाद तर इतर ६ बाहेरील जिल्ह्यातील होते, यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याचे आदेश दिले.
नव्याने आलेल्या कैद्यांमुळे तुरुंगामधील इतर कैदी अथवा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून तात्पुरते कारागृह उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एसबीओए शाळेस भेट दिली. मागीलवर्षी तात्पुरते कारागृह तेथे उभारल्यानंतर नूतनीकरणासाठी आलेला खर्च जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेस देण्याचे आदेश दिले. त्या परिसरात ३५ सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना केल्या.
कारागृहात १४०० कैदी
हर्सूल कारागृहामध्ये सध्या १४०० च्या आसपास कैदी तर २१५ कर्मचारी आहेत. एसबीओए शाळेतील ४ खोल्यांमध्ये पुरुष तर १ खोलीत महिला कैद्यांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, प्रभारी कारागृह अधीक्षक आर. आर भोसले, पोलीस निरीक्षक गिरी, नायब तहसीलदार सलोक, मुख्याध्यापिका माने आदींची उपस्थिती होती.