उमरदऱ्यासाठी ६८ लाखांचा निधी मंजूर
By Admin | Updated: June 20, 2014 00:46 IST2014-06-19T23:58:45+5:302014-06-20T00:46:06+5:30
जळकोट : कायम पाणीटंचाई समस्येचा त्रास सहन करणाऱ्या जळकोट तालुक्यातील उमरदरा गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून ६८ लाख रूपये किंमतीची नळ पाणीपुरवठा योजना नुकतीच मंजूर झाली .

उमरदऱ्यासाठी ६८ लाखांचा निधी मंजूर
जळकोट : कायम पाणीटंचाई समस्येचा त्रास सहन करणाऱ्या जळकोट तालुक्यातील उमरदरा गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून ६८ लाख रूपये किंमतीची नळ पाणीपुरवठा योजना नुकतीच मंजूर झाली असून, त्यामुळे या गावाची पाणीटंचाई समस्या कायमची मिटणार आहे़ शासनाने ही कायमस्वरूपी नळयोजना मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांतून मोठा आनंद व्यक्त होत आहे़
जळकोट तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण लातूर जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाई समस्येला तोंड देणारे एकमेव गाव म्हणजे उमरदरा़ दरवर्षी येथे टँकरने पाणीपुरवठा करावा लागायचा़ टँकर मिळायलाही विलंब लागायचा़ त्यातून हे गाव पुन्हा चर्चेत यायचे़ त्यामुळे उमरदऱ्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून कायमस्वरूपी नळयोजना व्हावी, अशी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीची मागणी होती़ त्यावरून ग्राम पंचायतीच्या मागणीनुसार तालुका व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेतून नळयोजना मंजूर करण्याचा प्रस्ताव योग्य त्या शिफारशीसह राज्य शासनाला पाठविला होता़ गावकऱ्यांची निकड लक्षात घेऊन पाणी पुरवठा मंत्री दिलीप सोपल यांनी ६८ लाखांची योजना मंजूर केली आहे़ (वार्ताहर)
या नळ योजनेचे काम आता तात्काळ सुरु होणार असून, पाणीटंचाईमुळे गावकऱ्यांचे दरवर्षी होणारे हाल थांबणार आहेत़ उमरदऱ्याचे सरपंच काशिनाथ काळे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने ही नळयोजना मंजूर झाली आहे़ पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी व्यवस्था उपलब्ध होणार असल्याने गावकऱ्यांकडून आनंद व्यक्त होत आहे़