६५ हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा
By Admin | Updated: July 30, 2014 00:49 IST2014-07-30T00:23:43+5:302014-07-30T00:49:40+5:30
दिनेश गुळवे, बीड जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

६५ हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा
दिनेश गुळवे, बीड
जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पीक विमा भरण्यासाठी अग्रही असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी सर्वाधिक पीकविमा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत भरला आहे. मंगळवारीही सुटीच्या दिवशी बॅँक सुरू असल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी गर्दी केली होती.
बीड जिल्ह्यात गेल्यावर्षीही दुष्काळजन्य परिस्थिती होती. पाऊस समाधानकारक पडला असला तरी पावसाने ओढ दिल्याने उत्पादन घटले होते. परिणामी एक लाख शेतकऱ्यांना शंभर कोटींपेक्षा अधिक रुपयांचा पीक विम्यापोटी रक्कम मिळाली होती.
यावषीही पावसाळा सुरू होऊन अद्यापही पावसाचे प्रमाण अवघे १२० मि.मी.च आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, तीळ आदी पिकांचा पेरा केला आहे. असे असले तरी पेरणीनंतर अद्यापही मोठा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या जिवाला धास्ती लागली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खत, मशागत यावर मोठा खर्च केला आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक आपत्ती आल्यास आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
पीक विमा भरण्यास शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी मंगळवारी सुटी असतानाही डीसीसी बॅँकेच्या सर्व ५९ शाखा सुरू ठेवण्यात आल्याची माहिती बॅँकेचे व्यवस्थापक अरूण कदम यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांनी मादळमोही, परळी, धर्मापुरी, आष्टी, अंमळनेर, पाटोदा, पाचंग्री, चौसाळा, नेकनूर, बर्दापूर, चकलांबा, धोंडराई, उमापूर, गंगामसला, तलवाडा आदी शाखांमध्ये गर्दी केली होती.
मंगळवार पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या ५९ शाखांमध्ये जवळपास ६५ हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी दहा कोटी रुपये भरल्याची माहिती बॅँकेचे उपव्यवस्थापक रवि उबाळे यांनी दिली. गेल्या वर्षीही डीसीसीमध्ये सर्वाधिक म्हणजे जवळपास ८० हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. यावर्षीही पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पीक विमा भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असल्याचेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांनी पीकविमा वेळेत भरावा
पीक विमा भरण्यासंदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, नैसर्गिक आपत्ती आल्यास व त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाल्यास पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते, यामुळे शेतकऱ्यांना फायदा होता. यावर्षी शेतकऱ्यांना शंभर कोटींपेक्षा अधिक रक्कम पीक विम्यापोटी मिळालेली आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा वेळेत भरावा, असे आवाहनही त्यांनी केले.