६० टक्के अग्निरोधक कालबाह्य

By Admin | Updated: July 21, 2014 00:24 IST2014-07-20T23:45:50+5:302014-07-21T00:24:01+5:30

उस्मानाबाद : अचानक लागलेली आग तातडीने आटोक्यात आणता यावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने १ हजार ९३ शाळांना अग्निरोधक मागील चार वर्षापूर्वी वितरित केले आहेत.

60 percent fire retard time | ६० टक्के अग्निरोधक कालबाह्य

६० टक्के अग्निरोधक कालबाह्य

उस्मानाबाद : अचानक लागलेली आग तातडीने आटोक्यात आणता यावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने १ हजार ९३ शाळांना अग्निरोधक मागील चार वर्षापूर्वी वितरित केले आहेत. या अग्निरोधकांचा केवळ एक वर्षाची वॉरंटी मुदत होती. त्यानंतर रिफिलींग करणे आवश्यक होते. मात्र अधिकाऱ्यांसोबतच मुख्याध्यापकांचेही दुर्लक्ष झाल्याने तब्बल ६० टक्क्यावर अग्निरोधक कालबाह्य झाले आहेत. शनिवारी तुळजापूर येथील जिल्हा परिषद शाळेत गॅसवर पोषण आहार शिजवत असताना अचानक गॅसचा भडका उडाला. नजीकच्याच पेट्रोलपंपावरुन अग्निरोधक आणून ही आग विझविण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या शाळेलाही अग्निरोधक पुरविण्यात आले आहेत. परंतु ते कार्यान्वित झाले नाही.
तुळजापूर येथील न्यायालयाच्या बाजूला असलेल्या जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत पोषण आहार गॅसवर शिजविला जात आहे. नित्यनियमाप्रमाणे शनिवारी संबंधित कर्मचारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पोषण आहार शिजवत असतानाच सिलेंडरपासून शेगडीकडे गेलेल्या गॅसच्या पाईपने अचानक पेट घेतला. हे पाहून येथील कर्मचारीही घाबरून गेले. तर काहींनी पळ काढला. धुराचे लोट पाहून आजूबाजूचे नागरिक जमा झाले. काही शिक्षकांनी प्रसंगावधान राखून शाळेपासून नजीक असलेल्या पेट्रोलपंपावरुन अग्निरोधक आणून आग आटोक्यात आणली. तोवर या आगीत शाळेतील अ‍ॅप्लीफायर, खुर्ची, कुकर, शेगडी जळून खाक झाली. या घटनेवेळी शाळेतील दोनशेवर विद्यार्थी कवायत मैदानावर होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, अशा स्वरुपाच्या घटना लक्षात घेऊन मागील चार वर्षापूर्वी जिल्ह्यातील १ हजार ४० प्राथमिक शाळा आणि ५३ माध्यमिक शाळांना अग्निरोधक पुरविण्यात आले होते. यावर लाखो रुपयांचा खर्च झाला आहे. सदरील अग्निरोधके एक वर्षानंतर पुन्हा रिफीलिंग करावी लागतील, असे संबंधित कंपनीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला कळविले होते. तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी ही जबाबदारी शाळांच्या मुख्याध्यापकांवर सोपविली होती. मात्र चार वर्ष लोटले तरीही ६० टक्के अग्नीरोधकांचे रिफीलींग केले नसल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. याचाच प्रयत्य तुळजापूरच्या शाळेत आला. तेथील अग्निरोधक कार्यान्वित झालेले नाहीत. त्यामुळे आतातरी शिक्षण विभागाने ही बाब गांभिर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
अनेक शाळांतील अग्निरोधक पडले अडगळीला
अग्निरोधक हे दर्शनी भागामध्ये ठेवणे बंधनकारक आहे. तशा त्या यंत्रावरही सूचना दिलेल्या असतात. मात्र अनेक शाळांकडून या सूचनेकडे कानाडोळा होताना दिसत आहे. काही शाळांत ही अग्निरोधके कपाटात, रद्दीच्या गठ्यावर तर काही शाळांमध्ये सहजासहजी नजरेस पडणार नाहीत, अशा ठिकाणी ठेवले आहेत. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
प्रशिक्षणही नाही
चार वर्षापूर्वी शाळांना अग्निरोधक यंत्र पुरविण्यात आली. यातील ७० टक्क्यांवर अग्निरोधक कालबाह्य झाले आहेत. त्यांचे रिफिलींग करणे आवश्यक आहे. असे असतानाच दुसरीकडे त्या-त्या शाळेवरील शिक्षकांनाही अग्निरोधकाच्या वापराबाबत फारशी माहिती नाही. त्यामुळे या गुरुजींना वापराबाबत प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे.
उपशिक्षणाधिकारी म्हणतात...
एक-दीड वर्षापूर्वी अशीच एका शाळेमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी गटशिक्षणाधिकाऱ्यांना अग्निरोधकाचे रिफीलींग करुन देण्याबाबत निर्देश दिले होते. मात्र त्याचा अहवाल आपल्याकडे आलेला नाही. त्यामुळे आणखी एक वेळा सर्व मुख्याध्यापक आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांना अग्निरोधकांचे रिफीलींग करण्याबाबत सूचित करण्यात येईल, उपशिक्षणाधिकारी जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: 60 percent fire retard time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.