बंदी आदेशानंतरही दिले ५५० बांधकाम परवाने

By Admin | Updated: August 19, 2015 00:05 IST2015-08-19T00:05:51+5:302015-08-19T00:05:51+5:30

दत्ता थोरे , लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी लातूर शहरात बांधकाम परवाने देण्यास बंदीचे आदेश दिल्यानंतरही महापालिका आयुक्तांकडून ५५० बांधकामे परवाने दिल्याचे पुढे आले आहे.

550 construction permits granted even after a ban order | बंदी आदेशानंतरही दिले ५५० बांधकाम परवाने

बंदी आदेशानंतरही दिले ५५० बांधकाम परवाने


दत्ता थोरे , लातूर
जिल्हाधिकाऱ्यांनी लातूर शहरात बांधकाम परवाने देण्यास बंदीचे आदेश दिल्यानंतरही महापालिका आयुक्तांकडून ५५० बांधकामे परवाने दिल्याचे पुढे आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याप्रकरणी आयुक्त सुधाकर तेलंग यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
लातूर महापालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंग यांना लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी दि. १० फेब्रुवारी २०१४ रोजी पत्र पाठविले होते. विभागीय आयुक्तांच्या पत्रांचा संदर्भ देत पाठविण्यात आलेल्या या पत्रात १ मार्च २०१४ पासून नवीन बांधकाम परवाने देवू नयेत, असे आदेश काढण्यात आले होते. याचे आदेश लातूर महापालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांना देण्यात आले होते. लातूर महापालिकेला हे आदेश १०/२/२०१४ रोजी काढले. हे आदेश दि. ११ रोजी महापालिकेला मिळाले. उपायुक्तांनी सही करुन अंमलबजावणीसाठी शेरा मारुन दि. १२ रोजीच नगररचना विभागाला कळविले. परंतु आदेश प्राप्त झाल्यापासून दि. २५/०२/१४ पर्यंत महापालिकेतून ५८ बांधकाम परवाने दिले होते. आयुक्तांनी पुन्हा २५/२/२०१४ रोजी नगररचना विभागाला आदेश काढून परवाने न देण्याच्या सूचना केल्या. परंतु १ मार्च २०१४ पर्यंत ४४ बांधकाम परवाने देण्यात आले होते. आणि त्याहून आर्श्चयाची बाब म्हणजे १ मार्च २०१४ पासून पुढे मार्च या एका महिन्यात पुन्हा ८५ बांधकाम परवाने देण्यात आले आहेत. हा आकडा एप्रिल महिन्यात ५८, मे महिन्यात ५६, जून महिन्यात ४२ व जुलै महिन्यात ६६, आॅगस्टमध्ये १०८, सप्टेंबरमध्ये ३३ असे बंदीचे आदेश आल्यापासून एकूण ४४८ बांधकाम परवाने आयुक्तांच्या आदेशानंतर देण्यात आले आहेत. आयुक्तांच्या आदेशानंतरही ४४८ आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मिळाल्यापासूनचे ५८ आणि आदेश काढलेल्या तारखेपासून ४४ असे एकूण ५५० बांधकाम परवाने लातूर महापालिकेने दिले आहेत. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी विभागीय आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे.
याबाबत महापालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंग यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माहिती घ्यावी लागेल, असे सांगितले. महापालिकेच्या नगर रचना विभागातून बांधकाम परवाने दिले जातात. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आल्यानंतर त्यांना माझेही आदेश होते. जर असे परवाने दिले गेले असतील तर याबाबत चौकशी करण्यात येईल व जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: 550 construction permits granted even after a ban order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.