छत्रपती संभाजीनगर : पडेगाव ते एमजीएम गोल्फ क्लबकडे जाणाऱ्या १०० फूट रस्त्यावरील बाधित मालमत्ता बुधवारी महापालिकेने पाडल्या. या भागातील धार्मिक स्थळही रस्त्यात बाधित होत होते. विरुद्ध दिशेला असलेल्या एका खासगी व्यक्तीने आपली जागा रस्त्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धार्मिक स्थळापासून रस्त्याची अलाईनमेंट बदलून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मनपाच्या या निर्णयामुळे धार्मिक स्थळ कायम राहिले.
पडेगाव येथील मुख्य रस्त्यापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर गोल्फ क्लब आहे. गोल्फ क्लबसमोरील रस्ता पूर्वी २४ मीटर होता. २०२५ मधील नवीन विकास आराखड्यात रस्ता ३० म्हणजे १०० फूट करण्यात आला. त्याचप्रमाणे हा परिसर ग्रीनमधून येलो करण्यात आला. तो सुद्धा (ईपी) शासन दरबारी प्रलंबित आहे. ग्रीन झोनमध्ये मालमत्ताधारकांनी प्लॉटिंग करून विकली. नागरिकांनीही प्लॉट घेऊन टोलेजंग इमारती उभारल्या. ५० ते ५० लाख रुपयांच्या मोठमोठ्या इमारती या रस्त्यावर होत्या. मनपाने मार्किंग दिल्यानंतर ५५ ते ६० मालमत्ताधारकांनी स्वत: ७० टक्के मालमत्ता काढून घेतल्या होत्या.
मालमत्ताधारकांचा आरोपया भागातील मालमत्ताधारकांनी मंगळवारी मनपात येऊन रस्त्याची अलाईनमेंट चुकीची आहे. मार्किंग चुकीची केली. ज्या भागात टीडीआर दिले, त्या भागात मार्किंग केली नाही, असे आरोप केले होते. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या सूचनेवरून बुधवारी सकाळी सहसंचालक नगररचना मनोज गर्जे, उपअभियंता कौस्तुभ भावे, नगरचनाकार राहुल मालखेडे यांच्यासह या ठिकाणी आले. त्यांनी मार्किंगची तपासणी केली. ती योग्य असल्याने निदर्शनास आले. मनपाने २०१३ मध्ये रस्ता २४ मीटर रुंद असताना ४ जणांना टीडीआर दिले. ही जागाही मनपाच्या ताब्यात आहे. ती रस्त्यात पूर्णपणे बाधित होत असल्याचेही लक्षात आले.
नागरिकांची घातली समजूत; मशीद वाचविण्यासाठी दिली जागापडेगाव येथे मुख्य रस्त्यावरच २४ मीटर रस्ता सोडून मशीद, मदरसा बांधला आहे. ३० मीटर रुंदीकरणानुसार मशीद, मदरसा ९ मीटर बाधित होत होते. मशिदीच्या समोर रऊफ हाजी यांची जागा आहे. त्यांनी मशीद वाचविण्यासाठी आपली जागा दिली. त्यामुळे मनपाने रस्त्याची अलाईनमेंट बदलून दिली.