५३ प्रकल्पातील साठा वाढला

By Admin | Updated: November 16, 2014 00:37 IST2014-11-16T00:35:08+5:302014-11-16T00:37:09+5:30

उस्मानाबाद : गत तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कोरडेठाक पडलेल्या तब्बल ५३ साठवण तलावातील पाणीपातळीत वाढ झाली आहे़

53 stocks in the project increased | ५३ प्रकल्पातील साठा वाढला

५३ प्रकल्पातील साठा वाढला



उस्मानाबाद : गत तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कोरडेठाक पडलेल्या तब्बल ५३ साठवण तलावातील पाणीपातळीत वाढ झाली आहे़ तर ३० लघू प्रकल्प कोरडेठाक असून, २११ प्रकल्पात केवळ २१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़
यंदा पावसाने ओढ दिल्याने नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभीपासूनच जिल्ह्यासह ग्रामीण भागात पाणीटंचाई जणावू लागली होती़ पाणीटंचाईचे स्वरूप उग्र होत असल्याने ग्रामीण भागातून शेकडो अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर दाखल झाले होते़ त्यातच गत काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे़ विशेषत: उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे़ उस्मानाबाद व तुळजापूर तालुक्यातील प्रत्येकी १८ लघू प्रकल्पातील उपयुक्त पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे़ तर उस्मानाबाद तालुक्यातील २ आणि तुळजापूर तालुक्यातील एका मध्यम प्रकल्पातील पाणीपातळी वाढली आहे़ या पावसामुळे बहुतांश गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याची चिन्हे असून, दोन ते तीन महिन्यांसाठी हे पाणी पुरेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे़ तर रबी हंगामातील पिकांसाठी याचा लाभ होताना दिसत असला तरी बागायतदारांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे़ तर तुरीचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे़
लघू प्रकल्पातील साठ्यात वाढ
उस्मानाबाद तालुक्यातील १८ लघू प्रकल्पातील पाणीपातळी वाढ झाली आहे़ यात सांजा, वरूडा, आळणी, उपळा, राघूचीवाडी, बेडकीनाला, वलगूड, गावसूद, पोहनेर, वलगूड, कौडगाव, अंबेजवळगा, खेड, उपळा, धुत्ता, शेकापूर, सकनेवाडी, कोंडवाडी या लघू प्रकल्पांचा समावेश आहे़
तुळजापूरकरही खुश
तुळजापूर तालुक्यातीलही १८ लघू प्रकल्पातील पाणीपातळी वाढली आहे़ यात यमाई, हंगरगा, कामठा, पिंपळा, मसला, सांगवीकाटी, मुरटा, अणदूर, शहापूर, सावरगाव, आपसिंगा, आरळी, किलज, मुर्टा, होर्टी, बंचाई, येडोळा, निलेगाव या लघू प्रकल्पांचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)
उस्मानाबाद तालुक्यातील (कंसातील आकडेवारी गत आठवड्यातील पाणी परिस्थितीची) रूईभर मध्यम प्रकल्पात १़५६४ दलघमी (०़०० दलघमी), वाघोली प्रकल्पात २़२९७ दलघमी (२़०४७ ), तुळजापूर तालुक्यातील खंडाळा मध्यम प्रकल्पात ०़८७७ (०़८७७ ), भूम तालुक्यातील रामगंगा प्रकल्पात ४़९३६ (४़९३६) दलघमी पाणीसाठा सद्यस्थिीत आहे़४
उमरगा तालुक्यातील ३५ लघू प्रकल्पापैकी केवळ कोळसूर प्रकल्पातील पाणीपातळी (२़७९८ दलघमी) वाढली आहे़ कळंब तालुक्यातील चोराखळी (१़७९६ दलघमी) व वडजी (०़४५९ दलघमी) या दोन प्रकल्पातील पाणीपातळीत वाढ झाली आहे़ तर भूम तालुक्यातील सहा प्रकल्पातील पाणीपातळीत वाढ झाली आहे़ यात बागलवाडी, आरसोली, पाथ्रूड, नांदगाव या लघू प्रकल्पांचा समावेश आहे़ वाशी तालुक्यातील सेलू, इराचीवाडी, पारा (१) या तीन प्रकल्पांमध्येही पाणीपातळी वाढली आहे़
जिल्ह्यातील १ मोठा, १७ मध्यम आणि १९३ लघू प्रकल्पात सध्यस्थितीत १९३़७८१ दलघमी पाणीसाठा आहे़ यातील १३३़४७९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे़ प्रकल्प क्षमतेनुसार पाहता सिना-कोळेगाव या मोठ्या प्रकल्पात मृतसाठा आहे़ तर एका मध्यम प्रकल्पात ५१ ते ७५ टक्क्याच्या दरम्यान, तीन प्रकल्पात २६ ते ५० टक्के, ६ प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी, ४ प्रकल्पात जोत्याच्याखाली पाणी आहे़ तर एक प्रकल्प कोरडाठाक आहे़ पाच लघू प्रकल्प १०० टक्के भरले आहेत़ ११ लघू प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे़ २१ लघू प्रकल्पात २६ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान पाणी आहे़ ३९ प्रकल्पात २५ टक्क्यांहून कमी, ५७ प्रकल्पात जोत्याखाली तर २९ लघू प्रकल्प कोरडेठाक आहेत़
गत आठ दिवस जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे़ मात्र, परंडा व लोहारा तालुक्याच्या काही भागात आणि तोही तुरळक प्रमाणात पाऊस झाला आहे़ त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील मध्यम, लघू प्रकल्पातील पाणीपातळी वाढ झाली नसून, पाण्याचे प्रमाण घटत असल्याचे चित्र असून, या परिसरातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना पावसाची प्रतिक्षा कायम आहे़

Web Title: 53 stocks in the project increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.