पहिल्याच दिवशी काढला ५० ट्रक गाळ
By Admin | Updated: May 6, 2016 23:57 IST2016-05-06T23:48:42+5:302016-05-06T23:57:07+5:30
औरंगाबाद : हर्सूल तलावातील गाळ काढण्यास गुरुवारी शुभारंभ झाला. दिवसभरात एका जेसीबीच्या मदतीने ५० पेक्षा जास्त ट्रॅक्टर व टेम्पो एवढा गाळ काढण्यात आला.

पहिल्याच दिवशी काढला ५० ट्रक गाळ
औरंगाबाद : हर्सूल तलावातील गाळ काढण्यास गुरुवारी शुभारंभ झाला. दिवसभरात एका जेसीबीच्या मदतीने ५० पेक्षा जास्त ट्रॅक्टर व टेम्पो एवढा गाळ काढण्यात आला. निजामकालीन हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी राज्य सरकारने दोन वर्षांपूूर्वी मनपाला २ कोटी रुपयांचा निधी दिला होता. दोन वर्षांत तलावात पाणी असल्याने गाळ काढण्याचे काम सुरू झाले नव्हते. यंदा तलाव कोरडा पडल्यामुळे गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले.
सकाळी १०.३० वाजता महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या हस्ते नारळ फोडून गाळ काढण्याचा शुभारंभ झाला. यावेळी नगरसेविका ज्योती अभंग, नगरसेवक शिवाजी दांडगे, राज वानखेडे, रूपचंद वाघमारे, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता के. एम. फालक यांची उपस्थिती होती. शहर अभियंता पानझडे म्हणाले, तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ असून, केवळ दोन कोटी रुपयांत फार गाळ निघणार नाही. मात्र, पाणी साठवण वाढावी म्हणून लेव्हल करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तलावाच्या जागेचे मोजमाप करण्यात येत होते. त्यानुसार हद्द निश्चित करण्यात आली असून, तलावाला तारेचे कुंपण करण्यात येणार आहे. तलावातील पाण्याचा जास्त वापर करता यावा म्हणून पाणी उपसा केंद्रापर्यंत चर खोदण्यात येणार आहे.
जास्तीच्या निधीची मागणी करा
२ कोटी रुपयांमध्ये गाळ कमी निघणार असेल तर शासनाकडे नव्याने प्रस्ताव पाठवून निधीची मागणी करा, अशा सूचना महापौरांनी आयुक्तांना केल्या. तसेच गाळ काढण्याचे दरवर्षी नियोजन करण्यात यावे, असेही महापौरांनी यावेळी स्पष्ट केले.