५० टन ऑक्सिजनचा पुरवठा, १५ टनची जिल्ह्यातच निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:04 IST2021-04-22T04:04:46+5:302021-04-22T04:04:46+5:30
औरंगाबाद : जिल्ह्याला रोज ६१ टन ऑक्सिजन लागत आहे. औरंगाबादला बुधवारी ५० टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा झाला. ...

५० टन ऑक्सिजनचा पुरवठा, १५ टनची जिल्ह्यातच निर्मिती
औरंगाबाद : जिल्ह्याला रोज ६१ टन ऑक्सिजन लागत आहे. औरंगाबादला बुधवारी ५० टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा झाला. तर १५ टनपेक्षा अधिक ऑक्सिजन जिल्ह्यातूनच उपलब्ध होत आहे. त्यामुळे सध्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले.
घाटी रुग्णालयात ऑक्सिजन टँकच्या पाहणीप्रसंगी ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पुण्याहून शहराला ऑक्सिजनपुरवठा होतो. हा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी कर्मचारी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. वाळूज येथील दोन आणि गेवराई तांडा, शेंद्रा येथील दोन अशा चार पुरवठादारांकडून जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. यात एअर काॅम्प्रेसरद्वारे हवेतील ऑक्सिजन सिलिंडरमध्ये भरले जाते आणि त्यानंतर या सिलिंडरचा रुग्णालयांना पुरवठा केला जातो. तर रुग्णालयांतील टँकसाठी लिक्विड स्वरूपातील ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. हा पुरवठा चाकण-पुणे, रायगड, ठाणे येथून औरंगाबादला होतो. दोन दिवसांपूर्वी हा पुरवठा विस्कळीत झाल्याने जिल्ह्यात काही रुग्णालयांतील ऑक्सिजन संपण्याच्या मार्गावर आला. परंतु सध्या पुरवठा सुरळीत असल्याचे सांगण्यात येत आहे. एअर काॅम्प्रेसरद्वारे २० टनपर्यंत ऑक्सिजन तयार होत असल्याने कोणतीही अडचण नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे (औषध) सहआयुक्त संजय काळे यांनी सांगितले.
रुग्णालयांकडून तक्रारी
ऑक्सिजनपुरवठा पूर्वपदावर येत आहे. परंतु काही रुग्णालयांकडून ऑक्सिजन उशिरा मिळत असल्याच्या तक्रारी औषध प्रशासनाकडे केल्या जात आहेत. प्रत्येक रुग्णालयाला ऑक्सिजन उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न केला जात आहे.