१८ जागांसाठी ४६ उमेदवार
By Admin | Updated: March 19, 2017 23:22 IST2017-03-19T23:17:25+5:302017-03-19T23:22:14+5:30
धारुर धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या दोन गटात सरळ लढत होणार असल्याचे अर्ज काढणी नंतर स्पष्ट झाले आहे.

१८ जागांसाठी ४६ उमेदवार
अनिल महाजन धारुर
धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या दोन गटात सरळ लढत होणार असल्याचे अर्ज काढणी नंतर स्पष्ट झाले आहे. १८ जागांसाठी ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसला एक संघ पॅनल उभा करण्यात यश आले आहे तर भाजपाला मात्र बंडखोरी रोखता आली नाही, असे दिसून येते. ही निवडणूक चुरशीची होणार, असे चित्र दिसत आहे.
धारूर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये दोन गटात चुरशीची लढत होत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली १७ उमेदवारांचे एकसंघ पॅनल देण्यात आले असून भाजपाला मात्र बंडखोरी रोखण्यात अपयश आल्याचे आज चिन्ह वाटप दिवशी स्पष्ट झाले. व्यापारी, ग्रामपंचायत व हमाल मापाडी मतदारांत राष्ट्रवादी तर बहुतांश सोसायटी मतदारांवर भाजपाचे वर्चस्व असल्याने निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडीसाठी ४ एप्रिल रोजी मतदान तर ५ रोजी मतमोजणी होणार आहे.
सध्या बाजार समितीवर राष्ट्रवादीचे नेते प्रकाश सोळंके यांचे निर्विवाद वर्चस्व असून रमेशराव आडसकरांच्या भाजप प्रवेशानंतर प्रथमच होत असलेल्या निवडणुकानंतर बाजार समिती कोणाच्या ताब्यात जाणार हे मतदानानंतर स्पष्ट होणार आहे. कृउबाच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.