४५ नगरसेवक असूनही भाजपाला मताधिक्य
By Admin | Updated: May 20, 2014 01:10 IST2014-05-20T00:34:36+5:302014-05-20T01:10:19+5:30
व्यंकटेश वैष्णव, बीड लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बीड विधानसभा मतदार संघात विशेषत: बीड शहरातून राष्ट्रवादीला सर्वाधिक मताधिक्य देऊ,

४५ नगरसेवक असूनही भाजपाला मताधिक्य
व्यंकटेश वैष्णव, बीड लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बीड विधानसभा मतदार संघात विशेषत: बीड शहरातून राष्ट्रवादीला सर्वाधिक मताधिक्य देऊ, अशी वल्गना करणार्या नेत्यांचा निकालानंतर फुगा फुटला आणि भाजपाला बीड शहरातून २ हजार ११४ मताधिक्य मिळाले़ बीड लोकसभा निवडणुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. कारण भाजपाचे राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे व एकेकाळी त्यांचेच शिष्य असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस हे एकमेकांच्या विरोधात उभे होते़ बीड मतदार संघात राष्ट्रवादीच्या तंबूत अकरा आमदारांची फौज होती तर भाजपाकडून एकच आमदार म्हणजेच पंकजा पालवे या खा़ मुंडेसाठी प्रचारात उतरल्या होत्या़ बीड विधानसभा मतदार संघात पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी प्रचाराची धुरा संभाळली होती़ मोदी लाटेपुढे कोणाचाच टिकाव लागला नाही़ बीड शहरात सुरूवातीपासूनच पालकमंत्री क्षीरसागर यांनी विशेष लक्ष दिले होते़ शहरातील बहुतांश भागात प्रचार सभा घेतल्या होत्या़ याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बीड नगर परिषदेत ४६ पैकी ४५ नगर सेवक राष्ट्रवादीचे म्हणजेच पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे आहेत़ असे असताना देखील एकट्या बीड शहरातून भाजपाला २८ हजार ६९० एवढे मतदान झाले तर सुरेश धस यांना २६ हजार ५७६ एवढी मते पडली़ जिल्ह्यातील राकॉच्या आमदारांना पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे आपापल्या विधानसभा मतदार संघातून मताधिक्य देण्याची ताकीद पक्ष प्रमुखांनी दिली होती़ मात्र जनतेचा कौल भाजपाच्या बाजूने राहिल्याने राकॉचे मनसुबे धुळीला मिळाले आणि भाजपाला चांगले यश मिळाले़ मोदी लाट रोखली बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघापैकी बीड विधानसभा मतदार संघात भाजपाला केवळ ३८५५ एवढेच मताधिक्य मिळाले आहे. मोदी लाट असताना देखील पालकमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे इतर विधानसभा मतदार संघाप्रमाणे भाजपाला बीड विधानसभा मतदार संघात मताधिक्य मिळाले नाही हे तितके च खरे.