४२ वर्षांनंतर मोठा दुष्काळ !

By Admin | Updated: August 22, 2014 00:59 IST2014-08-22T00:46:53+5:302014-08-22T00:59:45+5:30

बालाजी थेटे , औराद शहाजानी जून, जुलै आणि निम्मा आॅगस्ट संपला तरी लातूर जिल्ह्यात उन्हाळाच आहे. एकदा पेरणी झाली, पण उगवले नसल्याने दुबार पेरणी करावी लागली. आता तर पावसाचा थेंबही नाही

42 years after a great famine! | ४२ वर्षांनंतर मोठा दुष्काळ !

४२ वर्षांनंतर मोठा दुष्काळ !




बालाजी थेटे , औराद शहाजानी
जून, जुलै आणि निम्मा आॅगस्ट संपला तरी लातूर जिल्ह्यात उन्हाळाच आहे. एकदा पेरणी झाली, पण उगवले नसल्याने दुबार पेरणी करावी लागली. आता तर पावसाचा थेंबही नाही. डोळ्यांदेखत उभे पीक करपत आहे. १९७२ पेक्षा भयावह परिस्थिती ओढवली आहे. त्यावेळी १५० मि.मी. पेक्षा कमी पाऊस झाला होता. आता २१ आॅगस्ट अखेर १७८.२ मि.मी. पाऊस झाला. ४२ वर्षांनंतर दुष्काळाची भयावह स्थिती आली आहे. माणसं जगतील, पण जनावरे कशी जगवावीत, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी परिसर ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो. परंतु, यंदा पावसाअभावी ही ओळख पुसून जात आहे. पिके वाळत आहेत. दरवर्षी जून महिन्यात पेरणी होते. पण यावर्षी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी झाली. त्यानंतर थोडा पाऊस झाल्याने पिकांना उभारी आली होती. परंतु, नंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे पिके कोमेजून गेली. आता तर करपत आहेत. उभी पिके डोळ्यांदेखत करपत असल्याने काही शेतकऱ्यांनी पिकावर नांगर फिरविला आहे. तगरखेडा येथील शेतकरी नरसिंग गोविंद तिफनवणे यांनी सोयाबीन, ज्वारीचे पीक करपत असल्याने पिकावरच बैलपाळी घातली. पेरणीनंतर पिके आली, पण नंतर पाऊस झालाच नाही. त्यामुळे पिकांनी माना टाकल्या. आता तर ते होरपळू लागली आहेत, हे पाहवत नसल्याने त्यांनी उभ्या पिकावर पाळी चालविली. विलास पाटील यांनीही दहा एकर सोयाबीन पिकावर पाळी घातली आहे. अशोक बिराजदार, नरसिंग तिफनबणे यांचीही पिके वाळून गेल्याने पाळी घालण्यात आली आहे. नरसिंग तिफनबणे यांनी ८० किलो सोयाबीन, १० किलो तूर, २ किलो तीळ, ५ किलो ज्वारीचा पेरा केला होता. त्यासाठी २५ हजार रुपये खर्च आला. परंतु, पाण्याअभावी ही सर्व पिके वाळून गेली असल्याचे ते म्हणाले.

१९७२ ला जून महिन्यात ३०, जुलै महिन्यात ३०.४०, आॅगस्ट महिन्यात १०.०४, सप्टेंबरमध्ये ६०.०८, आॅक्टोबरमध्ये ७.४ मि.मी. पाऊस झाला होता. १५२.२ मि.मी. वार्षिक सरासरी पाऊस झाला होता. यंदा २०१४ मध्ये जून महिन्यात ७३.०, जुलै महिन्यात ८३.०, आॅगस्ट महिन्यात २२.२ मि.मी. पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरी १७८.२ मि.मी. पाऊस आहे. १९७२ पेक्षा सरासरीत यंदाचा पाऊस थोडा अधिक असला स्थिती वाईट आहे.

औराद परिसरातून तेरणा व मांजरा या दोन नद्या वाहतात. औराद, वांजरखेडा, तगरखेडा, सोनखेड, गुंजरगा, किल्लारी, मदनसुरी येथे कोल्हापुरी बंधारे आहेत. परंतु, पाऊस झाला नसल्यामुळे बंधारे कोरडे पडले आहेत. साठवण तलाव व ओढेही कोरडेच आहेत. अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागत आहे.
मोरांची संख्या घटली...
४पावसाळा म्हटले की, मोरांचे थवे दिसायचे. परंतु, यंदा मोरांची संख्या घटलेली दिसत आहे. नदीचे पाणी आटल्याने ही संख्या घटली आहे. पक्ष्यांचा किलबिलाटही कमी झाला आहे. टोळीने राहणारे शेकडो वानर अन्न-पाण्याच्या शोधात गावांकडे धाव घेताना दिसत आहेत.

१९७२ चा दुष्काळ अनुभवलेले शेतकरी अशोक बिराजदार म्हणाले, त्यावेळच्या दुष्काळात जून महिन्यात थोडा पाऊस पडला होता. त्यावेळी पाणी होते. परंतु, अन्नधान्य नव्हते. या दुष्काळात उलट स्थिती आहे. अन्नधान्य आहे, परंतु पाणी नाही. त्यावेळी नाले, ओढे, नद्या, तलावांत पाणी होते. परंतु, यंदाच्या दुष्काळात सगळीकडेच कोरड आहे.
४व्यंकटराव वलांडे म्हणाले, १९७२ च्या दुष्काळात पाणीटंचाई जाणवली नव्हती. परंतु, अन्नधान्यासाठी भटकंती करावी लागली. या दुष्काळात धान्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु, पाणी नाही अन् जनावरांना चाराही नाही.

औराद कृषी मंडळाअंतर्गत ३१ हजार २०० हेक्टर्सवर खरीपाची पेरणी झाली आहे. यापैकी अडीचशे शेतकऱ्यांनी बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. तर दोनशे हेक्टर्सवरील शेतकऱ्यांनी पिके वाळत असल्याने नांगर फिरविला आहे, असे मंडळ कृषी अधिकारी गोपाळ जाधव यांनी सांगितले.

Web Title: 42 years after a great famine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.