शिवजयंतीनिमित्त ४१ हजार वृक्षांची लागवड
By Admin | Updated: March 10, 2016 00:42 IST2016-03-10T00:26:23+5:302016-03-10T00:42:00+5:30
उस्मानाबाद : जिल्हा शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात तब्बल ४१ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असून,

शिवजयंतीनिमित्त ४१ हजार वृक्षांची लागवड
उस्मानाबाद : जिल्हा शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात तब्बल ४१ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, वन्य पशु-पक्ष्यांसाठी पाण्याच्या २०० हौदांचेही वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी दिली.
येत्या २६ मार्च रोजी तिथीप्रमाणे येणारी शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी बुधवारी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिकांची बैठक पार पडली. यावेळी शिवजयंती महोत्सव समितीच्या कार्यकारणीची घोषणाही करण्यात आली.
यावेळी पाटील म्हणाले, दुष्काळाचे गांभिर्य पाहून शिवजयंतीनिमित्त जिल्हा शिवसेनेच्या वतीने शहरात तब्बल ४१ हजार वृक्षांची लागवड करण्यासोबतच ती जगविण्यासाठी कायमस्वरुपी व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या भोगावती नदीच्या खोलीकरण व रूंदीकरणासाठीही पुढाकार घेण्यात येणार आहे. शहरातील ज्या भागात पाणी टंचाई आहे, अशा ठिकाणी शिवसेनेच्या वतीने तीन विंधन विहिरीही घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, शिवजयंतीनिमित्त २६ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता छत्रपतींच्या आश्वारुढ पुतळ्यास दुग्धाभिषेक, सकाळी साडेआठ वाजता शिवाजी चौकात छत्रपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करुन पूजन करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता शहरातील मुख्य रस्त्यावरुन मोटारसायकल रॅली आणि सायंकाळी चार वाजता छत्रपतीच्या पुतळ्याची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.