४० हजार लिटर लस साठवणुकीची क्षमता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:29 IST2020-12-17T04:29:42+5:302020-12-17T04:29:42+5:30
औरंगाबाद : कोरोरोनाची लस वर्षअखेरीस किंवा नवीन वर्षाच्या प्रारंभी उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे लसीकरणाच्या तयारीला शासकीय तसेच प्रशासकीय ...

४० हजार लिटर लस साठवणुकीची क्षमता
औरंगाबाद : कोरोरोनाची लस वर्षअखेरीस किंवा नवीन वर्षाच्या प्रारंभी उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे लसीकरणाच्या तयारीला शासकीय तसेच प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. आजघडीला सुमारे ४० हजार लिटर लस साठविण्याची क्षमता सज्ज आहे.
पहिल्या टप्प्यात शासकीय आणि खाजगी रुग्णालयांतील डाॅक्टर, परिचारिकांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. ही संख्या जवळपास ३३ हजारांवर आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सिडकोतील कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात वॉक इन फ्रीजर आणि वॉक इन कुलर आहे. या दोन्हींची क्षमता प्रत्येकी १२ क्युबिक मिटर इतकी आहे, तर छावणी येथेही १२ क्युबिक मिटर क्षमतेचे वॉक इन कुलर आहे. १ क्युबिक मिटर म्हणजे एक हजार लिटरची क्षमता होते. त्यानुसार ३६ हजार लिटरची क्षमता सध्या सज्ज आहे. मनपाकडे २४ आईस लाईन रेफ्रिजरेटर आहे.
शीतगृहांची जय्यत तयारी
लसींच्या साठ्यासाठी मोठी क्षमता असलेले ‘वॉक इन फ्रीजर’ आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या पार्किंगच्या जागेत केले जाणार आहे. फ्रीजरमध्ये चालत जाता येऊ शकेल. या फ्रीजरची ४० क्युबिक मिटर इतकी क्षमता असणार आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात, रुग्णालयांत आईस लाईन रेफ्रिजरेटरची सुविधाही आहे. गरजेनुसार खासगी कोल्ड स्टोरेजचाही वापर केला जाऊ शकतो.
लस पोहोचण्यासाठी वाहनांचे नियोजन
आरोग्य उपसंचालक कार्यालयात सर्वप्रथम लसीचा साठा दाखल होण्याची शक्यता आहे. तेथून त्या ‘वॉक इन फ्रीजर’, ‘वॉक इन कुलर’च्या ठिकाणी रवाना केल्या जातील. त्यानंतर ग्रामीण भागातील केंद्रांकडे पाठविल्या जातील. त्यासाठी वाहनांचे नियोजन केले जात आहे. प्रारंभी केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असल्याने कोणतीही अडचण येणार नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले.
----
कोणत्या प्रकारची लस उपलब्ध होईल, यावर साठवणूक क्षमता निश्चित होईल. १२ क्युबिकल मिटरच्या परिसरात १ मिलियन डोस बसू शकतात. छावणी, कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात लस साठविता येते. इतर ठिकाणीही लसी ठेवण्याची सुविधा आहे.
- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक