४० गावांना तीव्र झळा...
By Admin | Updated: June 27, 2014 00:27 IST2014-06-27T00:21:35+5:302014-06-27T00:27:04+5:30
मारूती कदम , उमरगा पावसाने यंदाही हुलकावणी दिल्याने तालुक्यातील ९६ पैकी जवळपास ४० गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़

४० गावांना तीव्र झळा...
मारूती कदम , उमरगा
पावसाने यंदाही हुलकावणी दिल्याने तालुक्यातील ९६ पैकी जवळपास ४० गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ एका गावात टँकर तर २० गावांसाठी ३० अधिग्रहणे करण्यात आली असून, ६० साठवण तलाव कोरडेठाक पडले आहेत़
उमरगा तालुक्याची पावसाची सरासरी ९५० मिमी आहे़ गतवर्षी सरासरपीपैकी ८५० मि़मी़पाऊस झाला होता़ तर तालुक्यात कमी-अधिक ठिकाणी पाऊस झाल्याने काही ठिकाणचे तलाव भरले तर काही ठिकाणचे निम्म्यापर्यंतच भरले होते़ गत सहा वर्षे कमी अधिक प्रमाणात पावसाचे प्रमाण असेच राहिले आहे़ सद्यस्थितीत तालुक्यातील ६० साठवण तलाव कोरडेठाक पडले आहे़ बेनितुरा, कोळसूर, तुरोरी, जकापूर या तलावाही अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे़ उन्हाची तीव्रता कायम असली तरी पावसाची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली आहे़ गत काही दिवसांपासून ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे़ उमरगा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी धरणातही अत्यल्प पाणीसाठा आहे़ त्यामुळे शहराला आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे़ तालुक्यातील चिंचोली (ज़), गुरूवाडी, चिंचकोटा, डिग्गी, कदेर, पळसगाव, बेंळंब तांडा, काटेवाडी, चिरेवाडी, बोरी, गुंजोटी, नारंगवाडी, केसरजवळगा, समुद्राळ, एकोंडी (ज़), मळगी, भगतवाडी आदी गावात तीव्र टंचाई निर्माण झाली आहे़ चिंचोली (ज़) येथे गत दोन महिन्यापासून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे़ तर २० गावांसाठी ३० ठिकाणी विहिरी, कुपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़ तर प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे पाठविलेले ३० प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत़ एकूणच वाढत्या उन्हाच्या तीव्रतेत आणि पावसाने पाठ फिरविल्याने पाणीटंचाई उग्र रूप धारण करीत आहे़
८९ लाखांचा कृती आराखडा
तालुक्यात निर्माण झालेल्या व संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने ८८ लाख, ९२ हजार रूपयांचा कृती आराखडा तयार केला आहे़ सदरील आराखडा मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला आहे़
वन्य प्राणी गावकुसाला
पावसाने ओढ दिल्याने साठवण तलाव, विहिरी, शेततळी आदी ठिकाणचे पाणीसाठे कोरडेठाक पडले आहेत़ वनक्षेत्रातही पिण्याचा पाण्याचा अभाव असल्याने वानर, ससे, मोर, कोल्हे, तरस आदी वन्य प्राणी गावाच्या शिवारातील जलस्त्रोतांवर तहान भागविण्यासाठी येत असल्याचे दिसत आहे़ वनविभागाने वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे़