रास्ता रोको प्रकरणी ४० आंदोलकांना दंडाची शिक्षा

By Admin | Updated: July 22, 2014 00:16 IST2014-07-21T23:51:01+5:302014-07-22T00:16:28+5:30

लातूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने लातूर तालुक्यातील करकट्टा येथे २००१ साली ऊस दरासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते़

40 sentenced to life imprisonment | रास्ता रोको प्रकरणी ४० आंदोलकांना दंडाची शिक्षा

रास्ता रोको प्रकरणी ४० आंदोलकांना दंडाची शिक्षा

लातूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने लातूर तालुक्यातील करकट्टा येथे २००१ साली ऊस दरासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते़ दरम्यान, मुरुड पोलिसांत गुन्हा दाखल होऊन जिल्हा न्यायालयात खटला दाखल झाला होता. न्यायालयात सुनावणी होऊन सोमवारी जिल्हा न्यायालयाने ४० आंदोलकांना प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा दंड अथवा दंड न भरल्यास पंधरा दिवसांचा कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे.
२००१ साली शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सत्तार पटेल, अण्णासाहेब पाटील, रशीद पठाण, जयराम पाटील, गोरोबा मोदी, हणमंत भिसे, काकासाहेब नावपुरे, बंडू माळी, अशोक भुजबळ, तानाजी ढोबळे यांच्यासह ४० शेतकऱ्यांनी उसाला चांगला भाव मिळावा, यासाठी करकट्टा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते़ याप्रकरणी मुरूड पोलिस ठाण्यात गैरकायद्याची मंडळी जमवून रास्ता रोखणे, दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते़
या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उपरोक्त ४० आंदोलकांवर गैरकायद्याची मंडळी जमवून दहशत निर्माण केल्याचा ठपका ठेवून प्रत्येकी २ हजार ५०० रूपये दंड किंवा १५ दिवसांचा तुरूंगवासाची शिक्षा सुनावली़
दरम्यान, सायंकाळी ५ वाजता ४० शेतकऱ्यांचा १ लाख रूपये दंडाची रक्कम न्यायालयात जमा केल्यावर संबंधित आंदोलनकर्त्यांची सुटका करण्यात आली़ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड़ विजयकुमार जाधव यांनी काम पाहिले़ (प्रतिनिधी)
प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा दंड...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ४० कार्यकर्त्यांना न्यायालयाने प्रत्येकी अडीच हजार किंवा १५ दिवसांचा तुरूंगवास अशी शिक्षा सुनावली़ दंड भरल्याशिवाय सुटका नसल्याचे आदेश बजावण्यात आले होते़ दुपारी ३ वाजता न्यायालयाने निकाल दिल्यानंतर तब्बल २ तास कार्यकर्ते न्यायालयातच थांबले होते़ सायंकाळी ५ वाजता ४० जणांचा १ लाख रूपये रोख दंड भरल्यानंतर त्या कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली़
आंदोलकांवर गैरकायद्याची मंडळी जमवून दहशत निर्माण केला़ तसेच रहदारीस अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवून मुरुड पोलिसात २००१ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल होऊन सोमवारी त्याची अंतिम सुनावणी झाली आणि न्यायालयाने आंदोलकांना प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवसांचा कारावास, अशी शिक्षा सुनावली. मात्र आंदोलकांनी दंड भरून सुटका करून घेतली.

Web Title: 40 sentenced to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.