‘हमदर्द’ ची ४० कोटींची गुंतवणूक
By Admin | Updated: October 22, 2016 00:52 IST2016-10-22T00:04:53+5:302016-10-22T00:52:52+5:30
औरंगाबाद : ‘हमदर्द लॅबोरेटरीज’ ची युनानी आणि आयुर्वेदिक औषधी आता शेंद्र्यात बनणार आहेत. ‘हमदर्द’ कडून ४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून,

‘हमदर्द’ ची ४० कोटींची गुंतवणूक
औरंगाबाद : ‘हमदर्द लॅबोरेटरीज’ ची युनानी आणि आयुर्वेदिक औषधी आता शेंद्र्यात बनणार आहेत. ‘हमदर्द’ कडून ४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, सुमारे पाचशे जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. युनानी आणि आयुर्वेदिक औषधी निर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘हमदर्द’ने शेंद्रा औद्योगिक वसाहतीत १६ हजार चौरस मीटरचा भूखंड खरेदी केला आहे. भूखंड खरेदीचा व्यवहार औरंगाबादेत गुरुवारी करण्यात आला. ८ जुलै २०१७ पर्यंत प्रत्यक्ष उत्पादन घेण्यास सुरुवात होईल.‘हमदर्द’च्या शेंद्रा येथील कारखान्यात सात औषधींचे उत्पादन घेतले जाणार आहे. हमदर्द हेअर आॅईल, रोघन आवळा खस तेल, जोशिना लिक्विड, मास्टुरिन लिक्विड, साफी लिक्विड, जीग्रीन लिक्विड, विशेष पावडर यांची निर्मिती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ‘हमदर्द’ कडून ४० कोटींची गुंतवणूक केली जाणार असून, सुमारे ५०० जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांनी दिली. औषधनिर्मिती करणारे आघाडीचे शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. अमेरिकेच्या अन्न व औषधी प्रशासन विभागाने (यूएसएफडीए) मान्यता दिलेल्या सहा कंपन्या औरंगाबादेत कार्यरत आहेत. वोक्हार्ट, आॅर्चिड, इंडिको रेमिडीज, हर्मन फिनोकेम, एफडीसी अशा नामांकित कंपन्यांपाठोपाठ ‘हमदर्द लॅबोरेटरीज’ औरंगाबादेत सुरू होणार असल्याने शहराचा नावलौकिक वाढणार आहे. हकीम अब्दुल हमीद यांनी नवी दिल्लीत १९०६ साली ‘हमदर्द’ची स्थापना केली होती. जगभरातील २२ देशांत या कंपनीची औषधी निर्यात केली जातात.