४ हजार मूर्ती शिल्लक
By Admin | Updated: August 31, 2014 00:42 IST2014-08-31T00:26:51+5:302014-08-31T00:42:54+5:30
गणेशमूर्ती कुठे ठेवायच्या, असा यक्षप्रश्न आता विक्रेत्यांना पडला आहे.

४ हजार मूर्ती शिल्लक
औरंगाबाद : गणेशोत्सवानिमित्त यंदा स्थानिक मूर्तिकार, गुजरातमधून आलेल्या मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्तींसोबतच नगर, जालना, पेण व थेट अहमदाबाद येथूनही मोठ्या प्रमाणात श्रीच्या मूर्ती आणण्यात आल्या होत्या. त्यात सेव्हन हिल परिसर, शिवाजीनगर, टीव्ही सेंटर आदी परिसरातही गणेशमूर्ती उपलब्ध झाल्याने शहराच्या आसपासच्या गणेशभक्तांनी जिल्हा परिषद मैदानावर जाणे टाळले. परिणामी, सुमारे ४ हजार लहान मूर्ती शिल्लक राहिल्या. शिल्लक मूर्ती कुठे ठेवायच्या, असा यक्षप्रश्न आता विक्रेत्यांना पडला आहे.
शुक्रवारी घरोघरी गणरायाचे जल्लोषात आगमन झाले. सेव्हन हिल परिसर, टीव्ही सेंटर परिसरातील मूर्ती विक्रेत्यांकडील बहुतांश मूर्ती विक्री झाल्या; पण जिल्हा परिषद मैदानावर ४ हजार मूर्ती शिल्लक राहिल्या. आज शनिवारी आमच्या प्रतिनिधीने या विक्रेत्यांना भेट दिली तेव्हा ते मूर्ती कॅरिबॅगमध्ये पॅक करून लोडिंग रिक्षामधून नेत होते. जिल्हा परिषद मैदानावर यंदा ७० स्टॉल लावण्यात आले होते. यात प्रत्येकाकडे ३० ते ४० टक्के मूर्ती शिल्लक राहिल्या. यासंदर्भात ज्येष्ठ विक्रेते अशोक राठोड यांनी सांगितले की, २००० या वर्षापासून जिल्हा परिषद मैदानावर श्री मूर्तींची विक्री करण्यात येते. पूर्वी शहरातूनच नव्हे तर ग्रामीण भागातूनही येथे गणेशभक्त मूर्ती खरेदीसाठी येत असत. मात्र, आता सेव्हन हिल परिसर, टीव्ही सेंटर, आविष्कार कॉलनी चौक या परिसरात मोठ्या प्रमाणात मूर्ती विक्री करण्यात येत आहेत. याशिवाय जवाहर कॉलनी व आसपासच्या कॉलन्यांमध्ये तेथील रहिवाशीच मूर्ती आणून विकत आहेत. घराजवळच मूर्ती मिळत असल्याने तसेच शहरात गर्दी व पार्किंगची समस्या असल्याने आता जिल्हा परिषद मैदानावर मूर्ती खरेदीसाठी येणे गणेशभक्त टाळत आहे. परिणामी, यंदा ४ हजारांपेक्षा अधिक मूर्ती शिल्लक राहिल्या. सचिन महाजन या विक्रेत्याने सांगितले की, २००९ मध्येही मोठ्या प्रमाणात मूर्ती शिल्लक राहिल्या होत्या. मागील वर्षी येथे ५८ स्टॉल होते. यंदा ७० स्टॉल लावण्यात आले होते. विक्रेत्यांची संख्या वाढल्याने त्याचाही परिणाम विक्रीवर झाला. गुजरातमधील मूर्तिकार धनियाभाई राठोड म्हणाले की, मागील वर्षी १ हजार मोठ्या मूर्ती तयार केल्या होत्या. त्यातील ४० टक्के उरल्या होत्या. यंदा ५०० मूर्ती आम्ही तयार केल्या व मार्केटचा अंदाज घेऊन विक्री केल्याने आमच्याकडील मूर्ती शिल्लक राहिल्या नाहीत.
यंदा ७ ते ८ फुटांच्या ४ मूर्ती शिल्लक राहिल्या, अडीच ते तीन फुटांच्या ४५ मूर्ती, तर लहान आकारातील ४ हजार मूर्ती शिल्लक राहिल्या आहेत. विक्रेते तांबे म्हणाले की, आता शिल्लक मूर्ती कुठे ठेवायच्या, असा यक्षप्रश्न विक्रेत्यांना पडला आहे.
परराज्यांतून मूर्ती आल्यामुळे परिणाम
मूर्तिकार सतीश छत्रे यांनी सांगितले की, दरवर्षी औरंगाबादेत अडीच ते तीन लाख मूर्तींची विक्री होत असते. शहरात सर्व मूर्तिकार मिळून दोन ते अडीच लाख मूर्ती बनवितात. बाकीच्या मूर्ती नगर व पेणमधून आणण्यात येतात.
मात्र, यंदा जालना जिल्ह्यातून तसेच थेट अहमदाबाद येथूनही मोठ्या प्रमाणात मूर्ती आणण्यात आल्या. त्यात घराजवळ मूर्ती उपलब्ध झाल्याने सिडको- हडको, शिवाजीनगर, गारखेडा परिसरातील गणेशभक्तांनी जिल्हा परिषद मैदानाकडे पाठ फिरविली. या सर्व कारणांमुळे मूर्ती शिल्लक राहिल्या.