औरंगाबाद जिल्ह्यासाठी ४ हजार ईव्हीएमचा कोटा निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:23 IST2018-05-07T00:21:48+5:302018-05-07T00:23:39+5:30
लोकसभा निवडणुका निर्धारित वेळेत होवोत अथवा तत्पूर्वी होवोत, जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने इलेक्ट्रिक व्होटिंग मशिन्स मागणीचा आढावा घेतला असून, जिल्ह्यासाठी ४ हजार नवीन मशिन्सचा कोटा निश्चित झाल्याचे पत्र जिल्हा निवडणूक विभागाला आयोगाने पाठविले आहे

औरंगाबाद जिल्ह्यासाठी ४ हजार ईव्हीएमचा कोटा निश्चित
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लोकसभा निवडणुका निर्धारित वेळेत होवोत अथवा तत्पूर्वी होवोत, जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने इलेक्ट्रिक व्होटिंग मशिन्स मागणीचा आढावा घेतला असून, जिल्ह्यासाठी ४ हजार नवीन मशिन्सचा कोटा निश्चित झाल्याचे पत्र जिल्हा निवडणूक विभागाला आयोगाने पाठविले आहे. त्यानुसार जुलै ते सप्टेंबरपर्यंत मशिन्सची जमवाजमव करण्याची तयारी सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.
राज्याला २ लाख २५ हजार ईव्हीएम मिळतील. गरजेपेक्षा १७५ पट मशिन्सची मागणी करण्यात आली होती. २,५७७ मतदान केंद्रांची नोंद सध्या जिल्हा प्रशासनाकडे आहे. त्यानुसार बॅलेट व कंट्रोल युनिटच्या मागणीनुसार ४ हजारांच्या आसपास युनिट मिळतील.
मार्च अखेरपर्यंत २६ लाख ५० हजार ३७९ एकूण मतदार जिल्ह्यात आहेत. त्यामध्ये १४ लाख ६ हजार ८२३ पुरुष आणि १२ लाख ४३ हजार ५३८ महिला मतदारांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत २३ लाख १४ हजार ९७ मतदार होते. चार वर्षांत जिल्ह्यामध्ये ३ लाख ३६ हजार २१७ मतदार वाढले आहेत.
३५० हून अधिक मतदान केंद्रे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी वाढण्याची शक्यता सध्या आहे. जानेवारीअखेरीस मतदार नोंदणीचा कार्यक्रम घेण्यात आला असला तरी नोंदणी नियमितपणे सुरू आहे.
जिल्ह्यात गंगापूर-खुलताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगाव, पूर्व, पश्चिम, मध्य हे मतदारसंघ येतात. पैठण, फुलंब्री, सिल्लोड हे विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात आहेत. भौगोलिकदृष्ट्या मतदारसंघाच्या रचनेत काहीही बदल होणार
नाही.
मतदारसंघ मागच्या वेळी ज्या भौगोलिक सीमेत होता, तेवढाच यावेळीदेखील राहील. विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान केंद्रसंख्या ही वाढलेल्या मतदार संख्येमुळे वाढणार आहे.
३ लाख ३६ हजार मतदार वाढले
जिल्ह्यात २०१४ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत चार वर्षांत ३ लाख ३६ हजार २१७ मतदार वाढले आहेत. ८५ हजार नवमतदारांची भर दरवर्षी पडली आहे. यापुढे होणाºया नोंदणी कार्यक्रमात सुमारे १ लाख मतदार नव्याने नोंदणी होण्याची शक्यता आहे. मतदार नोंदणी वर्षभर सुरूच राहणार आहे.
२३ लाख १४ हजार ९७ मतदार होते
२०१४ साली २३ लाख १४ हजार ९७ मतदार होते. त्यासाली लोकसभा निवडणुकीसाठी २४ एप्रिल रोजी मतदान, तर १६ मे २०१४ रोजी मतमोजणी झाली होती.
डिसेंबर २०१८ मध्ये लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता सध्या तरी कमीच आहे. निर्धारित वेळेत निवडणुका होतील, कारण निवडणूक आयोगाकडून अद्याप त्याअनुषंगाने काहीही सूचना आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.