शहरातील ४ टक्के पाणी नमुने दूषित
By Admin | Updated: June 2, 2014 01:35 IST2014-06-02T01:30:21+5:302014-06-02T01:35:01+5:30
औरंगाबाद : पाण्याची अनुजैविक, रासायनिक, ब्लिचिंग पावडर आणि आयोडिन तपासणी आरोग्य विभागाच्या प्रादेशिक प्रयोगशाळेकडून केली जाते.

शहरातील ४ टक्के पाणी नमुने दूषित
औरंगाबाद : पाण्याची अनुजैविक, रासायनिक, ब्लिचिंग पावडर आणि आयोडिन तपासणी आरोग्य विभागाच्या प्रादेशिक प्रयोगशाळेकडून केली जाते. गेल्या महिन्यात प्रयोगशाळेने केलेल्या पाणी तपासणीमध्ये औरंगाबाद शहरातील विविध वॉर्डांमधील ४ टक्के पाणी दूषित असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील कन्नड शहराला होणार्या पाणीपुरवठ्यातील २८ टक्के नमुने दूषित असल्याचे समोर आले आहे. छावणी परिसरातील निजाम बंगला येथे सार्वजनिक आरोग्य विभागाची प्रादेशिक प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत औरंगाबादसह जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरी, बोअरवेल आणि नळाच्या पाण्याची जैविक आणि रासायनिक तपासणी केली जाते. मानवाला सर्वाधिक आजार दूषित पाणी प्यायल्यामुळे होतात. दूषित पाण्यामुळे साथरोग पसरण्याचा धोका असतो. तसेच काही जलसाठ्यात रासायनिक अंश आढळतात. काही पाण्यात आयोडिनचे प्रमाण कमी आढळते. आयोडिनच्या कमतरतेमुळे गलगंड होण्याचा धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाने औरंगाबाद शहरासह वैजापूर, गंगापूर, सिल्लोड आणि पाचोड या ठिकाणी उपविभागीय प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. या प्रयोगशाळेत ग्रामीण भागातील पेयजल नमुन्याची तपासणी केली जाते. निजाम बंगला येथील प्रादेशिक प्रयोगशाळेत औरंगाबाद शहरासह सर्व तालुक्यांच्या गावातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या नळाद्वारे दिल्या जाणार्या नमुन्यांची तपासणी केली जाते. याविषयी प्रभारी प्रादेशिक अधिकारी एस. व्ही. पत्की यांनी सांगितले की, प्रयोगशाळेत औरंगाबाद शहरातील पाणी काही भागात दूषित असल्याचे निदर्शनास आले. कन्नड नगर परिषदेने तपासणीसाठी पाठविलेल्या २० पैकी ५ नमुने दूषित आढळले आहेत. खुलताबाद नगर परिषदेने ३० नमुन्यांची तपासणी केली. मात्र, हे सर्व नमुने उत्कृष्ट आढळले. पैठण नगर परिषदेच्या हद्दीत ११ पैकी १ पाण्याचा नमुना दूषित होता. तर वैजापूर नगर परिषदेने तपासणीसाठी पाठविलेल्या २० पाणी नमुन्यांपैकी १ नमुना दूषित होता. याबाबतचा अहवाल नगर परिषद आणि संबंधित वॉर्ड अधिकार्यांना पाठविण्यात आला होता. औरंगाबाद मनपाची जलशुद्धीकरणाची प्रक्रिया उत्कृ ष्ट आहे. केवळ पाण्याच्या टाकीपासून ते नागरिकांच्या नळापर्यंत जाणार्या पाईपलाईनमध्ये गळती असेल तरच पाणी दूषित होते. २८ नमुने दूषित औरंगाबाद मनपाच्या विविध वॉर्ड ‘अ’ आणि वॉर्ड ‘ड’, वॉर्ड ‘ब’ आणि वॉर्ड ‘क’, वॉर्ड ‘ई’ आणि वॉर्ड ‘फ’ मधून प्रत्येकी पाच नमुने, असे ३० नमुने तपासणीसाठी येतात. गेल्या महिन्यात मनपाकडून ६५३ पाणी नमुने तपासणीसाठी आले होते. त्यापैकी २८ नमुने दूषित आढळले.