३९५ ग्रा.पं. निवडणुकीसाठी ८२०२ उमेदवार रिंगणात

By Admin | Updated: April 17, 2015 00:41 IST2015-04-17T00:32:31+5:302015-04-17T00:41:06+5:30

लातूर : लातूर जिल्ह्यातील ३९५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर ४४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे.

395 G.P. 8202 candidates are in the fray for the elections | ३९५ ग्रा.पं. निवडणुकीसाठी ८२०२ उमेदवार रिंगणात

३९५ ग्रा.पं. निवडणुकीसाठी ८२०२ उमेदवार रिंगणात


लातूर : लातूर जिल्ह्यातील ३९५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर ४४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे. या निवडणुकीसाठी जिल्हाभरातून८ हजार २०२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला वेग आला आहे.
लातूर जिल्ह्यातील ३९५ ग्रामपंचायतीअंतर्गत व ४४ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी ९९५८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील ९ हजार ५६७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर ३९१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. काही उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे अखेरच्या टप्प्यात ८ हजार २०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने गावोगावी दुरंगी, तिरंगी व चौरंगी लढती होत आहेत. तर पोटनिवडणुकीमध्ये ४४ ग्रामपंचायतींपैकी ३२ ग्रामपंचायतींमध्ये ४८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले. यापैकी १४ उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर ३६ उमेदवार पोटनिवडणुकीअंतर्गत निवडणूक रिंगणात आहेत.
लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने चार निवडणूक समन्वयक पाठविले आहे. यामध्ये लातूर व औशासाठी गजानन जोशी, अहमदपूर, चाकूर व रेणापूर या तीन तालुक्यांसाठी बाबासाहेब झुंबडे, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्यांसाठी नवनाथ माने, तर उदगीर आणि जळकोट तालुक्यांसाठी मारुती कोठारे अशा चौघांना निवडणूक आयोगाने लातूर जिल्ह्यासाठी पाठविले आहे. (प्रतिनिधी)
लातूर जिल्ह्यातील ३९५ ग्रामपंचायतींपैकी ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्यात आल्या आहेत. यामध्ये लातूर-६, रेणापूर-३, निलंगा-१३, उदगीर-४, अहमदपूर-८, चाकूर-३, देवणी-५, शिरूर अनंतपाळ-४, जळकोट-४ अशा एकूण ४९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर ३२ ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकीत सहा ग्रामपंचायतींच्या जागा बिनविरोध आल्या आहेत. यामध्ये औसा-१, निलंगा-०, उदगीर-१, अहमदपूर-२, चाकूर-१ आणि देवणी-१ आदींचा समावेश आहे. बिनविरोध निवडीमुळे या गावांतील ग्रामपंचायतींवर केला जाणारा खर्च वाचला आहे.
१५५० मतदान यंत्र दाखल...
४जिल्ह्यातील ३९५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तर ३२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका यासाठी १५५० इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन त्या-त्या तहसील कार्यालयांकडे पाठविण्यात आल्या आहेत. या मशीनबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी हैदराबादचे तीन इंजिनिअर दाखल झाले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ३९५ ग्रामपंचायती व ३२ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी १४७ निवडणूक निर्णय अधिकारी, ११७ क्षेत्रीय अधिकारी, १४३० मतदान केंद्राध्यक्ष, ३६०४ मतदान अधिकारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी १४०० अशा एकूण ६ हजार ६९८ कर्मचाऱ्यांना १२ एप्रिल रोजी प्रशिक्षण देण्यात आले असून, उर्वरित कर्मचाऱ्यांनाही त्या-त्या तहसील कार्यालयाअंतर्गत प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे.

Web Title: 395 G.P. 8202 candidates are in the fray for the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.