३८४२ बेरोजगार तरुणांचे 'सीएमईजीपी' मार्फत अर्ज; कर्ज केवळ ३१२ जणांनाच
By प्रशांत तेलवाडकर | Updated: January 18, 2024 18:18 IST2024-01-18T18:17:42+5:302024-01-18T18:18:03+5:30
जिल्हा उद्योग केंद्राला मागील वर्षी १०५० युवकांचे अर्ज बँकेकडे पाठवण्याचे उद्दिष्ट सरकारने दिले होते.

३८४२ बेरोजगार तरुणांचे 'सीएमईजीपी' मार्फत अर्ज; कर्ज केवळ ३१२ जणांनाच
छत्रपती संभाजीनगर : बेरोजगार तरुणांची फौज वाढत आहे. त्यांनी नोकरीच्या मागे न लागता, स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून रोजगारदाते व्हावे या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ( सीएमईजीपी) सुरू केला आहे. मात्र, मागील वर्षी ३८४२ युवकांनी कर्जासाठी अर्ज केले, व त्यातील ३१२ जणांचे अर्ज बँकेने मंजूर केले.
वर्षभरात ३८४२ अर्ज
जिल्हा उद्योग केंद्राला मागील वर्षी १०५० युवकांचे अर्ज बँकेकडे पाठवण्याचे उद्दिष्ट सरकारने दिले होते. केंद्राने ३८४२ अर्ज बँकांकडे पाठवले होते.
बँकेने दिले ३१२ जणांनाच कर्ज
जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने ३८४२ अर्ज बँकांना पाठवण्यात आले. त्यातील ३१२ अर्ज मंजूर करून त्यांना कर्ज देण्यात आले.
आकडेवारी काय सांगते?
ऑनलाइन अर्ज : ३८४२
त्रुटी अभावी रद्द : १८२९
बँकांकडून कर्ज मंजूर : ३१२
प्रलंबित : १७०१
कोणाला मिळू शकते कर्ज
१) कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी.
२) १८ वर्षे वय पूर्ण केलेले ( जास्तीत जास्त ४५ वर्ष)
३) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांच्यासाठी जास्तीत जास्त वय ५० वर्ष.
निकष काय ?
अर्जदाराने यापूर्वी पीएमईजीपी किंवा केंद्र-राज्य सरकारच्या अन्य विभागाकडून, कोणत्याही महामंडळाकडून अनुदानावर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा. १० लाखांवरील प्रकल्पासाठी ७ वी उत्तीर्ण, २५ लाखांवरील प्रकल्पासाठी १० वी उत्तीर्ण असावा. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्रात संपर्क साधावा.
जिल्हा उद्योग केंद्राने युवकांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज
ही योजना बेरोजगार युवकांसाठी सुवर्णसंधी आहे. मात्र, युवकांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यानी भरलेल्या अर्जात मोठ्या त्रुटी राहतात. ते अर्ज बाद होतात. यासाठी जिल्हा उद्योग केंद्राने अर्ज भरण्यासंदर्भात युवकांना सविस्तर व योग्य माहिती द्यावी, जेणे करून अर्जात त्रुटी राहणार नाही. एनपीएचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने बँका सर्व तपासणी करून मगच कर्ज देतात. यामुळे कर्ज मंजुरीचे प्रमाण कमी दिसते.
- मंगेश केदार,व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक