छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ बाजार समित्यांसाठी ३७८ उमेदवार निवडणूक रिंगणात
By स. सो. खंडाळकर | Updated: April 21, 2023 13:02 IST2023-04-21T13:01:47+5:302023-04-21T13:02:45+5:30
७ बाजार समित्यांसाठी येत्या २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ बाजार समित्यांसाठी ३७८ उमेदवार निवडणूक रिंगणात
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील ७ बाजार समित्यांच्या निवडणुकीचे चित्र गुरुवारी स्पष्ट झाले आहे. आता ३७८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, या उमेदवारांना शुक्रवार, दि. २१ एप्रिल रोजी चिन्हांचे वाटप होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीसह फुलंब्री, पैठण, लासूर स्टेशन, वैजापूर, गंगापूर आणि कन्नड या ७ बाजार समित्यांसाठी येत्या २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस होता. अनेक इच्छुकांनी या निवडणुकीतून माघार घेतली. सर्वाधिक ८६ उमेदवार कन्नड बाजार समितीत आपले नशीब आजमावत आहेत. सर्वांत कमी ३८ उमेदवार पैठणमध्ये रिंगणात आहेत. अन्य बाजार समितीत फुलंब्री-४२, लासूरस्टेशन-५८, वैजापूर -५६, छत्रपती संभाजीनगर-४७, आणि गंगापूर बाजार समितीमध्ये ५१ उमेदवार रिंगणात आहेत.
छत्रपती संभाजीनगर कृउबाच्या निवडणुकीसाठी १८ जागांसाठी १८३ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी १३२ जणांनी माघार घेतली. आता ४७ उमेदवार रिंगणात असून, ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. सुरुवातीला अवैध ठरलेला जगन्नाथ काळे यांचा अर्ज अपीलात गेल्यानंतर वैध ठरला.