३५६ गावांना मिळणार मदत
By Admin | Updated: April 17, 2015 00:39 IST2015-04-17T00:34:14+5:302015-04-17T00:39:15+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील आर्थिक मदतीपासून वंचित राहिलेल्या रबीच्या ३५६ गावातील पिकांची अंतीम पैसेवारी १५ मार्च रोजी जाहीर झाली असून,

३५६ गावांना मिळणार मदत
उस्मानाबाद : जिल्ह्यातील आर्थिक मदतीपासून वंचित राहिलेल्या रबीच्या ३५६ गावातील पिकांची अंतीम पैसेवारी १५ मार्च रोजी जाहीर झाली असून, या गावांना जवळपास १०० कोटी रूपये नुकसानीपोटी मदत मिळण्याची शक्यता आहे़ याबाबत गुरूवारी शासनाचे आदेश निर्गमित झाले आहेत़
प्रत्येक वर्षी अनेक गावे नुकसानीच्या अनुदानापासून वंचित राहत होती़ याबाबत आ़ पाटील यांनी रबीच्या पिकांच्या ३५६ गावांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला होता़ यानुसार अंतीम पैसेवारीच्या आधारावर दुष्काळी परिस्थितीतील विविध उपाययोजना या गावांना लागू करण्यात आलेल्या आहेत़ याबाबतचा शासन निर्णय गुरूवारी निर्गमीत झाला आहे़ त्यामुळे या गावांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, दोन-तीन दिवसात शासनाचा निर्णय निर्गमीत होणे अपेक्षित आहे़ जिल्ह्यातील रबीच्या ३५६ गावातील १८३५१४ शेतकऱ्यांचे ३२९४८१ हेक्टर क्षेत्र दुष्काळाने बाधित झाले आहे़ रबी पिकांच्या नुकसानीपोटी शासनाच्या स्थायी आदेशाप्रमाणे जिरायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ४५०० रूपये, बागायतीसाठी प्रति हेक्टरी ९००० रूपये व फळबागांसाठी प्रती हेक्टरी १२००० रूपये मदत मिळणार आहे़ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास १०० कोटी ५६ लाख रूपये मदत मिळणे अपेक्षित आहे़ यात उस्मानाबाद तालुक्यातील ६९ गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना १९ कोटी ९३ लाख, तुळजापूर: ४७ गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना १३ कोटी ५० लाख, उमरगा : २१ गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना ६ कोटी ९६ लाख, लोहारा: १० गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना २ कोटी, ९२ लाख, भूम : ९० गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना २२ कोटी २० लाख, परंडा : ९६ गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना २९ कोटी तर वाशी : २३ गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना ५ कोटी १४ लाख रूपये मदत मिळणार आहे़ तसेच गारपीटीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळावी, यासाठीही आ. पाटील यांच्याकडून पाठपुरवा सुरू असल्याचे पत्रकात म्हटले आहे.(प्रतिनिधी)