३५ गावांना दूषित पाणी; ब्लिचिंग पावडरच नाही
By Admin | Updated: June 25, 2014 01:27 IST2014-06-25T01:10:40+5:302014-06-25T01:27:09+5:30
औरंगाबाद : दूषित पाण्यामुळे साथरोग उद्भवण्याचा धोका असला, तरी अनेक ग्रामपंचायती याविषयी गंभीर नाहीत.

३५ गावांना दूषित पाणी; ब्लिचिंग पावडरच नाही
औरंगाबाद : दूषित पाण्यामुळे साथरोग उद्भवण्याचा धोका असला, तरी अनेक ग्रामपंचायती याविषयी गंभीर नाहीत. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ३५ ग्रामपंचायतींकडे पाणी शुद्ध करण्यासाठी लागणारे ब्लिचिंग पावडरही उपलब्ध नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पंचायतराज व्यवस्थेत गावकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींकडे सोपविण्यात आलेली आहे.
त्यानुसार ग्रामपंचायतींनी पाणी शुद्ध करण्यासाठी नियमितपणे ब्लिचिंग पावडरचा वापर करणे अपेक्षित असते. मात्र, जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती ब्लिचिंग पावडरचा वापर न करताच नागरिकांना पाणी पुरवीत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे नुकतीच ब्लिचिंग पावडरच्या उपलब्धतेची तपासणी करण्यात आली. तेव्हा जिल्ह्यातील ८५८ ग्रामपंचायतींपैकी ८२१ ग्रामपंचायतींकडे हा साठा उपलब्ध असल्याचे दिसून आले. उर्वरित ३५ ग्रामपंचायतींकडे ब्लिचिंग पावडरचा साठा शिल्लक नाही. त्यामुळे संबंधित गावांमध्ये नागरिकांना शुद्धीकरणाच्या प्रक्रियेशिवायच पाणी पुरविले जात आहे. वैजापूर तालुक्यात सर्वाधिक १५ गावांमध्ये ब्लिचिंग पावडर नाही. (लोकमत ब्युरो)
ब्लिचिंग पावडर नसलेल्या ग्रामपंचायती
औरंगाबाद४
कन्नड १
वैजापूर १५
खुलताबाद११
सिल्लोड ०
गंगापूर ०
पैठण ३
सोयगाव १
फुलंब्री ०
एकूण ३५