३४ जणांची कोरोनावर मात; पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:02 IST2021-07-19T04:02:01+5:302021-07-19T04:02:01+5:30
अहवाल निगेटिव्ह : पण गंभीर प्रकृतीने उपचार घेण्याची रुग्णांवर वेळ, दीड वर्षात १३५ जण महिनाभरापेक्षा अधिक काळ रुग्णालयात संतोष ...

३४ जणांची कोरोनावर मात; पण
अहवाल निगेटिव्ह : पण गंभीर प्रकृतीने उपचार घेण्याची रुग्णांवर वेळ, दीड वर्षात १३५ जण महिनाभरापेक्षा अधिक काळ रुग्णालयात
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना निगेटिव्ह झाला म्हणजे, कोरोनाला हरविले, या भ्रमात राहू नका. कारण कोरोनावर मात केल्यानंतर निगेटिव्ह असूनही रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याची वेळ अनेकांवर ओढवत आहे. घाटी रुग्णालयात सध्या ३४ कोरोना निगेटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाची लागण झाल्यानंतर आणि त्यातून बाहेर पडल्यानंतरही अनेक गंभीर परिणाम रुग्णांमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पोस्ट कोविड उपचारांवर आरोग्य यंत्रणेला भर द्यावा लागला. कोविड पाॅझिटिव्ह म्हणून रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अनेक रुग्ण व्हेंटिलेटरवर जातात. त्यामुळे १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात राहावे लागते. घाटी रुग्णालयात गेल्या दीड वर्षात १३५ रुग्ण महिनाभरापेक्षा अधिक कालावधी दाखल होते. यातील अनेकांनी यशस्वी लढा दिला; परंतु अनेकांची झुंज अपयशी ठरली.
कोरोनामुळे फुप्फुसावर परिणाम होतो. १५ ते २० स्कोअर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते. फुप्फुसाची कार्यक्षमता कमी झाल्याने रुग्णाची प्रकृती गंभीर होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
------
पोस्ट कोविडचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांना
कोरोना विषाणू संसर्गाचा पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका हा ज्येष्ठांना पाहायाला मिळाला. यशस्वी उपचार घेऊन अनेक ज्येष्ठांनी कोरोनावर मात केली; पण ज्येष्ठांना अनेक व्याधी असतात. त्यामुळे पोस्ट कोविडचाही सर्वाधिक धोका हा ज्येष्ठांना असतो. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
------
कोरोनातून बरा; पण श्वसनाचा त्रास
- कोरोना व्हायरसमुळे फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे काही प्रमाणात श्वसनाचा त्रास राहू शकतो.
- फुप्फुसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी श्वासाचे व्यायाम, प्राणायाम, जमेल तेवढ्या प्रमाणात चालण्याचा व्यायाम करणे महत्त्वपूर्ण ठरते.
- रुग्णालयातून घरी गेल्यानंतर सेल्फ मॉनिटरिंग वेळोवेळी करणे गरजेचे आहे. चालताना, काम करताना श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला, तर वेळीच डाॅक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.
---
बरे झाल्यानंतरही घ्या काळजी
- कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी घरी गेल्यानंतरही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनामुक्त रुग्णांना पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी होते. अनेकांना थकवा लवकरच जाणवतो. सकस आहार घेण्यावर भर दिला पाहिजे.
- कोरोना होऊन गेला म्हणून विनाकारण घराबाहेर पडता कामा नये. कोरोना होऊन गेलेल्यांना पुन्हा कोरोना झाल्याचेही पाहायला मिळत आहे.
-----
कोविड-१९ टर्न निगेटिव्ह
कोविड पाॅझिटिव्ह रुग्ण उपचारासाठी दाखल होतात; परंतु अनेकांच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही. महिनाभर रुग्णालयात दाखल असतात. अशावेळी त्यांची आरटी-पीसीआर तपासणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह येतो. अशा रुग्णांना कोविड-१९ टर्न निगेटिव्ह म्हणून उल्लेख होतो.
-डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसिन विभागप्रमुख, घाटी रुग्णालय
--------
कोरोनाचे एकूण रुग्ण- १,४६,९४१
बरे झालेले रुग्ण - १,४३,१५८
सध्या उपचार सुरू - ३१२
कोरोनाचे एकूण बळी - ३,४७१
------
कोविड पाॅझिटिव्हिटी रेट - १.२४ टक्का