शेअर मार्केटचे आमिष दाखवून दोघांना ३१ लाखांना चुना

By सुमित डोळे | Published: April 25, 2024 07:34 PM2024-04-25T19:34:11+5:302024-04-25T19:36:01+5:30

शेअर मार्केटची रेफलर फ्रँचायजी चालवणाऱ्यालाच गंडा, छावणी ठाण्यात गुन्हा दाखल

31 lakhs to both of them by showing the lure of the stock market | शेअर मार्केटचे आमिष दाखवून दोघांना ३१ लाखांना चुना

शेअर मार्केटचे आमिष दाखवून दोघांना ३१ लाखांना चुना

छत्रपती संभाजीनगर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून बनावट डिमॅट खात्यात ६५ लाख ७८ हजार रुपयांचा नफा कमावल्याचे दाखवून दोन मित्रांना महिन्याभरात तब्बल ३१ लाख २२ हजारांचा गंडा घातला गेला. याप्रकरणी टेकस्टार्स कंपनीच्या गोविंद राम व डॉ. हर्षद शहा यांच्यावर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भावसिंगपुऱ्यात राहणारा ३३ वर्षीय तरुण काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो. शिवाय त्याच्याकडे ॲपस्टॉस्कची रेफलर फ्रँचायजीदेखील आहे. १ फेब्रुवारी रोजी त्याला व्हॉट्सॲपवर इशा आर्या नामक महिलेने ‘राम इन्व्हेस्टमेंट अकॅडमी’मध्ये जाॅइन करण्यासाठी लिंक पाठवली. तरुणाने तो ग्रुप जाॅइन केल्यावर रोज सायंकाळी ८ वाजता त्याद्वारे शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर गोविंद राम व शहा मार्गदर्शन करत होते. त्यानंतर सेबीच्या नोंदणीसाठी मात्र त्यांनी स्वतंत्र लिंक पाठवली. त्याद्वारे आरोपींनी दोन्ही मित्रांकडून ५ मार्च रोजी टेकस्टार्स कंपनीत डिमॅट खाते उघडले.

क्रमाक्रमाने विश्वासासह पैसेही घेत गेले
व्यवहारासाठी त्यांनी नाशिकस्थित बँक शाखा क्रमांक देऊन आधी १ लाख ६ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर १८ ते २२ मार्च दरम्यान तक्रारदारांनी एकूण ९ लाख ४९ हजार रुपयांची गुंतवणूक केली. २६ मार्च ते १० एप्रिलदरम्यान अनुक्रमे ३ लाख २२ हजार, ७५ हजार, ११ लाख ७० हजार, ५ लाख रुपये गुंतवले. दोघांच्या डिमॅट खात्यात त्या बदल्यात ६५ लाख ७८ हजार रुपयांचा नफा कमावल्याचे दाखवत होते. दोन्ही मित्रांनी सदर रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी त्यांना १० टक्के रक्कम भरल्यासच नफ्याची रक्कम काढता येईल, असे सांगितले. त्यानंतर वारंवार मागणी करूनही आरोपींनी प्रतिसाद दिला नाही, तेव्हा दोन्ही मित्रांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

Web Title: 31 lakhs to both of them by showing the lure of the stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.