सात महिन्यांपासून रखडले ३०० मीटर रस्त्याचे काम; विमाननगर कॉलनीतील नागरिक त्रस्त

By मुजीब देवणीकर | Published: April 14, 2024 11:52 AM2024-04-14T11:52:09+5:302024-04-14T11:55:01+5:30

विमान कॉलनीतील रस्ते खोदून सोडून देण्यात आले. जलवाहिन्याही टाकल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत.

300m road work stalled for seven months; Citizens of Vimannagar Colony are suffering | सात महिन्यांपासून रखडले ३०० मीटर रस्त्याचे काम; विमाननगर कॉलनीतील नागरिक त्रस्त

सात महिन्यांपासून रखडले ३०० मीटर रस्त्याचे काम; विमाननगर कॉलनीतील नागरिक त्रस्त

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा विमानतळासमोरील विमाननगर कॉलनीतील रस्त्याचे काम मागील सात महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अवघ्या ३०० मीटर रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेष बाब म्हणजे हा परिसर जालना लोकसभा मतदारसंघात येतो. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांचा आक्रोश सत्ताधारी पक्षाला परवडणारा नाही.

विमाननगर कॉलनीतील रस्त्यांची कामे सात महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली. आजपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाहीत. रस्ते खोदून तसेच सोडून देण्यात आले. रस्ते खोदत असताना अनेक नागरिकांचे नळ कनेक्शन कट झाले. त्यामुळे रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. नागरिकांच्या घरात चिखल येऊ लागला. सिमेंट रस्त्याचे काम सुरू करायला संबंधित यंत्रणा तयार नाही. हा सर्व त्रास नागरिक अनेक महिन्यांपासून सहन करीत आहेत. या भागातील माजी नगरसेवक संजय चौधरी यांनी सांगितले की, नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सिमेंट रस्त्यांना विलंब होत आहे. जलवाहिन्या टाकण्यासाठी या भागात पाइप आणून ठेवण्यात आल्या. मात्र, जलवाहिन्याही टाकल्या जात नाहीत.

आश्चर्यकारक बाब म्हणजे या भागात एका रस्त्याचे काम रात्रीतून पूर्ण करण्यात आले. काही बिल्डरांच्या दबावामुळे काही रस्त्यांची कामे लवकर, तर काही संथगतीने केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय. या सर्व परिस्थितीत महापालिका बघ्याची भूमिका घेत आहे. तक्रार केल्यानंतर मनपा संयम बाळगण्याचा सल्ला देत आहे.

Web Title: 300m road work stalled for seven months; Citizens of Vimannagar Colony are suffering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.